स्पोर्ट्स

Sunil Gavaskar : वैभव सूर्यवंशीच्या 'क्रेझ'नंतर गावस्करांचा धोक्याचा इशारा; म्हणाले, ‘कोणालाही लगेच सेन्सेशन म्हणणे घाईचे..’

गावस्कर यांच्या मते, या यशाने हुरळून न जाता संयम राखणे आवश्यक आहे.

रणजित गायकवाड

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख तारा वैभव सूर्यवंशी आणि १९ वर्षांखालील (U19) अन्य खेळाडूंच्या भोवती निर्माण झालेल्या वलयावर माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी कडक शब्दांत सावधगिरीचा इशारा दिला आहे. आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना बिहारच्या समस्तीपूर येथील १४ वर्षीय वैभवने अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, गावस्कर यांच्या मते, या यशाने हुरळून न जाता संयम राखणे आवश्यक आहे.

गावस्करांचा कडक इशारा

'मिड-डे' मधील आपल्या स्तंभात गावस्करांनी स्पष्ट केले की, १९ वर्षांखालील क्रिकेट आणि प्रथम श्रेणी क्रिकेट, तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप मोठी तफावत असते. "कोणालाही इतक्या लवकर 'सेन्सेशन' म्हणणे घाईचे ठरेल. आयपीएलमध्ये निवड झालेले काही खेळाडू समोरच्या गोलंदाजीला काहीच न समजता पहिल्या चेंडूपासून फटकेबाजीच्या नादात आपली विकेट गमावत आहेत," असे त्यांनी नमूद केले.

गावस्करांनी पुढे सांगितले की, "हा खेळाडूंचा गट तरुण आणि अननुभवी आहे. अशा वेळी वरिष्ठ खेळाडू किंवा मार्गदर्शकाने त्यांना हे सांगणे गरजेचे आहे की, गोलंदाजी कितीही साधारण असली तरी तुमची एक चूक तुम्हाला तंबूत धाडू शकते. आता आयपीएलचे विचार बाजूला ठेवून पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे."

वैभव सूर्यवंशीचा झंझावात

वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूंत शतक झळकावून खळबळ माजवली होती. त्याने मोहम्मद सिराज, इशांत शर्मा आणि रशीद खान सारख्या दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली होती. त्यानंतर युवा एकदिवसीय सामन्यांतही त्याने आपली लय कायम राखली. सध्या सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात अमेरिकेविरुद्ध तो स्वस्तात बाद झाला असला, तरी शनिवारी बांगलादेशविरुद्ध त्याने ७२ धावांची झुंजार खेळी करत जोरदार पुनरागमन केले.

सचिन तेंडुलकरशी तुलना आणि डब्ल्यू.व्ही. रमण यांचे मत

१४ वर्षीय वैभवच्या खेळाची तुलना क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी केली जात आहे, ज्याने १६ व्या वर्षी पदार्पण केले होते. मात्र, भारताच्या महिला संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यू.व्ही. रमण यांनीही सावध पवित्रा घेतला आहे. "आयपीएलनंतर पुन्हा १९ वर्षांखालील स्तरावर खेळणे वैभवच्या प्रगतीसाठी घातक ठरू शकते," असे मत त्यांनी व्यक्त केले.

विक्रमादित्य वैभव

वैभवने केवळ आयपीएलमध्येच नव्हे, तर 'विजय हजारे करंडक' स्पर्धेत बिहारकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्ध ८४ चेंडूंत १९० धावांची आतषबाजी केली होती. या खेळीत त्याने अब्राहम डी व्हिलियर्सचा 'लिस्ट ए' क्रिकेटमधील सर्वात वेगवान १५० धावांचा विक्रम १० चेंडू राखून मोडीत काढला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT