स्पोर्ट्स

T20 WC 2024 : पहिल्‍याच सामन्‍यात न्‍यूझीलंड ‘क्‍लीन बोल्‍ड’!अफगाणिस्‍तानचा शानदार विजय

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत आज मोठा उलटफेर पाहायला मिळाला. गत टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेतील उपविजेता आणि यंदाच्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेतील दावेदार मानले जाणार्‍या न्‍यूझीलंड संघाने पहिल्‍याच सामन्‍यात अत्‍यंत निराशाजनक कामगिरी केली. अफगाणिस्‍तान शानदार विजयाची नोंद करत संपूर्ण क्रिकेट विश्‍वाला पुन्‍हा एकदा आपली दखल घेणे भाग पाडले आहे. जाणून घेवूया या सामन्‍यात नेमकं काय घडलं ते….

गुरुबाज-झाद्रान यांची शतकी भागीदारी, न्‍यूझीलंडला दिले १६० धावांचे आव्‍हान

T20 विश्वचषक स्‍पर्धेत आज ( दि.8 जून ) न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान आमने-सामने होते. सामन्‍यापूर्वी कागदावरील रेकॉर्डप्रमाणे न्‍यूझीलंड हा सामना सहज जिंकेल, असे मानले जात होते. न्‍यूझीलंडने टॉस जिंकला. अफगाणिस्‍तानला प्रथम फलंदाजीसाठी निंमत्रण दिले. अफगाणिस्‍तानला रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्‍यांनी पहिल्‍या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी केली. न्‍यूझीलंडच्‍या मॅट हेन्रीने झाद्रानला बोल्ड करत संघाला पहिला यश मिळवून दिले.  त्‍याने तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४४ धावा केल्‍या. यानंतर हेन्रीने ओमरझाईला तंबूत धाडले. त्‍याने २२ धावा केल्‍या. गुरबाजने पाच चौकार आणि ५ षटकार फटकावत ५६ चेंडूत ८० धावांची स्‍फोटक खेळी केली. रशीद खान सहा धावा करून बाद झाला तर गुलबदिन नायब शून्य वरच तंबूत परतला. करीम आणि नजीबुल्लाह प्रत्‍येकी एक धाव घेऊन नाबाद राहिले. न्‍यूझीलंडच्‍या बोल्ट आणि हेन्रीने प्रत्येकी दोन बळी तर लॉकी फर्ग्युसनने एक बळी घेतला. अफगाणिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावत १५९ धावापर्यंत मजल मारली.

अफगाणिस्‍तानच्‍या गोलंदाजांसमोर न्‍यूझीलंडच्‍या फलंदाजांची शरणागती

विजयासाठी १६० धावांच्‍या लक्ष्‍याचा पाठलाग करण्‍यासाठी न्‍यूझीलंडची सलामीची जोडी मैदानात उतरली. अफगाणिस्‍तानच्‍या फजलहक फारुकी याने डावातील पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर फिन ऍलन याला क्‍लीन बोल्ड केले. यानंतर डेव्हॉन कॉनवे ८, डॅरिल मिशेल ५, केन विल्यमसन ९, मार्क चॅपमन ४, मायकेल ब्रेसवेल ०, ग्लेन फिलिप्स १८, मिचेल सँटनर ४, मॅट हेन्री १२, लॉकी फर्ग्युसन २ धावा करून बाद झाले. तर ट्रेंट बोल्ट तीन धावा करून नाबाद राहिला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. फजलहक फारुकी आणि राशिद खानने प्रत्येकी चार तर मोहम्मद नबीने दोन विकेट घेतल्या. विजयासाठी १६० धावांच्‍या लक्ष्‍याचा पाठलाग करणार्‍या न्‍यूझीलंडचा डाव केवळ 15.2 षटकांमध्‍ये केवळ ७५ धावांवरच आटोपला.

न्‍यूझीलंडसमोर दाेन संघाचे आव्‍हान

न्‍यूझीलंडचा संघ क गटात आहे. या गटात टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धा दोनवेळाचा विजेता आणि सह-यजमान वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील दोनच संघ सुपर 8 साठी पात्र ठरणार असल्याने हा गट खडतर आहे. संघात अनुभवी खेळाडूंबरोबर न्यूझीलंडकडे फिन ऍलन आणि रचिन रवींद्रसारखे युवा खेळाडूही आहेत. कागदावर न्‍यूझीलंड संघाची कामगिरी सरस असली तरी अफगाणिस्तानने न्‍यूझीलंडचा पहिल्‍याचा सामन्‍यात पराभव करत सुपर-8 साठी आपला दावा मजबूत केला.

SCROLL FOR NEXT