अफगाणिस्तान-न्यूझीलंड यांच्या खेळवला जाणारा एकमेव कसोटी सामना अखेर पावसामुळे रद्द झाला.  Twitter
स्पोर्ट्स

AFG vs NZ Test : अफगाणिस्तानविरुद्धची कसोटी रद्द झाल्याने न्यूझीलंडचे दुहेरी नुकसान

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : AFG vs NZ Test : अफगाणिस्तान-न्यूझीलंड यांच्या खेळवला जाणारा एकमेव कसोटी सामना अखेर पावसामुळे रद्द झाला. ग्रेटर नोएडामध्ये शुक्रवारी सकाळपासून पाऊस सुरूच होता आणि मैदान पाण्याने भरले होते. सामना अधिकाऱ्यांनी सकाळी मैदानाची पाहणी करून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत निवेदन जारी करताना म्हटले की, ‘ग्रेटर नोएडामध्ये अजूनही पाऊस पडत आहे आणि सततच्या पावसामुळे, अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटीचा पाचवा आणि शेवटचा दिवस देखील सामना अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे.’

ब्लॅककॅप्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानेही सोशल मीडियावर पोस्टद्वारे कसोटी रद्द झाल्याची माहिती दिली. शनिवार, 14 सप्टेंबरला हा संघ श्रीलंकेला रवाना होईल, जिथे किवींना कसोटी मालिका खेळायची आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकही चेंडू टाकल्याशिवाय कसोटी सामना रद्द होण्याची ही आठवी वेळ आहे. 26 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये हे प्रथमच पाहायला मिळाले आहे. यापूर्वी 1998 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ड्युनेडिन कसोटी रद्द करण्यात आली होती. न्यूझीलंडचा दुसरा सामना रद्द करण्यात झाला आहे. 1890 साली पहिल्यांदाच असा प्रकार घडला होता, जेव्हा कसोटीत एकही चेंडू टाकता आला नाही. आता 1998 नंतर ही अनोखी घटना पाहायला मिळाली आहे.

एकही चेंडू न खेळता रद्द झालेले कसोटी सामने

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ओल्ड ट्रॅफर्ड (1890)

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ओल्ड ट्रॅफर्ड (1930)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (1970)

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, कॅरिसब्रुक (1989)

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, बोर्डो (1990)

पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, इक्बाल स्टेडियम (1998)

न्यूझीलंड विरुद्ध भारत, कॅरिसब्रुक (1998)

अफगाणिस्तान वि न्यूझीलंड, ग्रेटर नोएडा (2024)

न्यूझीलंडचे नुकसान

अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना रद्द झाल्याबद्दल न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘एकही चेंडू न खेळता सामना रद्द होणे हे आमच्यासाठी निराशाजनक आहे. हा आमचा अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला कसोटी सामना होता आणि आम्ही त्यासाठी खूप उत्सुक होतो. या सामन्यानंतर आम्हाला श्रीलंका दौ-यावर जायचे आहे. तिथे 18 सप्टेंबरपासून WTC चा भाग असणारी कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धचा कसोटी सामना आमच्या तयारीसाठी खूप उपयुक्त ठरला असता. पण कसोटीच रद्द झाल्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांसाठी तयारी करण्याची संधी गमवावी लागली आहे.’

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT