मुंबई : टी-२० विश्वचषकात अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय डावाची सुरुवात अत्यंत नाट्यमय झाली आहे. भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा आपल्या पहिल्याच विश्वचषक डावात पहिल्याच चेंडूवर (गोल्डन डक) बाद होऊन माघारी परतला. यासह अभिषेकच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
भारतीय डावाच्या दुसऱ्या षटकात अमेरिकेचा वेगवान गोलंदाज अली खानने चेंडू हातात घेतला. पहिल्या चेंडूवर इशान किशनने एक धाव घेत अभिषेकला स्ट्राईक दिली. दुसऱ्याच चेंडूवर (१.२ ओव्हर) अली खानने टाकलेल्या ऑफ-स्टंप बाहेरील चेंडूला अभिषेकने हवेत चेंडू भिरकावला. मात्र, अमेरिकेने 'डीप कव्हर'ला लावलेल्या क्षेत्ररक्षकाच्या चक्रव्यूहात अभिषेक फसला. संजय कृष्णमूर्तीने एक अप्रतिम झेल घेत अभिषेकची खेळी शून्यावर संपुष्टात आणली.
टी-२० विश्वचषक पदार्पणातच शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत आता अभिषेक शर्माचे नाव जोडले गेले आहे. यापूर्वी गौतम गंभीर, आशिष नेहरा, शार्दुल ठाकूर आणि दीपक हुडा यांनाही अशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. मात्र, आशिष नेहरानंतर 'गोल्डन डक'वर (पहिल्याच चेंडूवर) बाद होणारा अभिषेक हा केवळ दुसरा भारतीय ठरला आहे.
अभिषेकने आतापर्यंत १७४ टी-२० सामने खेळले असून, दुर्दैवाने या प्रकारात तो १२ व्यांदा शून्यावर बाद झाला आहे.
डावखुरा फलंदाज असलेल्या अभिषेकने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३३.११ च्या सरासरीने एकूण ५,१०० धावा कुटल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याचा स्ट्राईक रेट १७३.५२ इतका प्रभावी आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तराचा विचार केल्यास, ३९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तो ४ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
भारताचे प्रतिनिधित्व करताना या आक्रमक सलामीवीराने ३६.०२ च्या सरासरीने १,२९७ धावा केल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा १९४.४५ हा तुफानी स्ट्राईक रेट त्याची आक्रमकता अधोरेखित करतो. स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिषेकला शून्यावर बाद होण्याची ही मालिका खंडित करून पुन्हा एकदा आपल्या बॅटची जादू दाखवावी लागणार आहे.