बंगळूर ; वृत्तसंस्था : सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा (आरसीबी) माजी धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये परतणार असल्याची माहिती मिळत आहे. तो प्रत्यक्ष मैदानात उतरणार नसला तरी संघाचा 'मेंटॉर' म्हणून आरसीबीच्या गोटात दाखल होणार असल्याचे समजते.
आयपीएल-2022 चा हंगाम येत्या 26 मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएलमधील 10 संघ मुंबई आणि पुण्यात होणार्या साखळी सामन्यांसाठी जय्यत तयारी करत आहेत. एबी डिव्हिलियर्स गेल्या अनेक वर्षांपासून आरसीबीचा एक महत्त्वाचा फलंदाज होता. गेल्या हंगामातच त्याने सर्व क्रिकेट प्रकारांतून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे तो आता येत्या हंगामात आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता नव्हती.
मात्र, आता आरसीबी आपल्या या 360 डिग्री प्लेअरला आयपीएलच्या 15 व्या हंगामात परत आणण्याच्या प्रयत्नात आहे. आरसीबी याबाबतची घोषणा काही दिवसांतच करण्याची शक्यता आहे. डिव्हिलियर्सला नवी भूमिका मिळण्याची शक्यता आहे.
डिव्हिलियर्स आता आरसीबीच्या मेंटॉरच्या रूपात दिसण्याची शक्यता आहे. याबाबतची घोषणा आरसीबी लवकरच करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. विराट कोहली आणि डिव्हिलियर्स यांचा दोस्ताना तसा फार जुना आहे. डिव्हिलियर्सने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तो 2010 पर्यंत दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळत होता. त्यानंतर तो 2011 मध्ये आरसीबीकडे आला.