IND vs ENG :
जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज अशी जसप्रीत बुमराहची ओळख आहे. मात्र इंग्लंड दौर्यातील पाच कसोटी सामन्यांपैकी केवळ तीन सामन्यातच तो खेळणार असल्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयाच अनेकांना धक्का बसला आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डीव्हिलियर्सने ( AB de Villiers) या निर्णयावर टीका केली आहे. भारतीय संघावर 'गैरव्यवस्थापना'चा ठपका ठेवत संघाने असा निर्णय का घेतला, असा सवाल केला आहे.
डीव्हिलियर्सने आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, "जसप्रीत बुमराह सध्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये जगातील अव्वल गोलंदाज आहे. त्यामुळे त्याला विश्रांती कशी द्यायची? हे ठरवणे खूप कठीण आहे. माझ्या मते, कसोटी क्रिकेट हा खेळाचा सर्वोच्च प्रकार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पाचही कसोटी सामन्यांसाठी त्याला तयार करायला हवे होते. अखेर त्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे भारतीय संघावर अवलंबून आहे."
डेल स्टेनचे उदाहरण देताना डीव्हिलियर्स म्हणाला की, बुमराहला कमी महत्त्वाच्या टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये विश्रांती द्यायला हवी होती. आम्ही डेल स्टेनसोबत असेच करायचो. त्याला कमी महत्त्वाच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकांमध्ये विश्रांती देऊन ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारतासारख्या संघांविरुद्ध परदेशातील मोठ्या कसोटी मालिकांसाठी तयार ठेवायचो."
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बुधवार, 2 जुलैपासून बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता नाही. वर्कलोड व्यवस्थापनाअंतर्गत बुमराह या दौऱ्यावर केवळ 3 कसोटी सामने खेळणार आहे, त्यापैकी एक सामना तो खेळला आहे. त्यामुळे आता तो केवळ दोनच सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. भारतीय संघाकडे त्याच्या बदलीसाठी अत्यंत मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. संघ व्यवस्थापनाला आकाशदीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांच्यापैकी एका खेळाडूची निवड करावी लागेल. बुमराहच्या अनुपस्थितीत भारताची गोलंदाजी निश्चितच कमकुवत होईल.मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी लीड्स कसोटीत निराशाजनक कामगिरी केली. मात्र, त्यांना संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घाईचा ठरू शकतो, असे काहींचे म्हणणे आहे. सध्या भारतीय संघ स्थित्यंतरातून जात असून भविष्याची गोलंदाजीची फळी तयार करणे, हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे.