मस्कत : ओमानमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील आशिया चषक २०२६ स्पर्धेत भारतीय संघाचा सलामीवीर आणि माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचा सुपुत्र आर्यवीर सेहवाग याचा तुफानी फॉर्म कायम आहे. संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या (यूएई) अखेरच्या साखळी सामन्यात १६० धावांची विक्रमी खेळी साकारल्यानंतर, अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही त्याने ५७ चेंडूंत ५१ धावांची झंझावाती अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार खेचले.
आर्यवीर सेहवागने या स्पर्धेत आतापर्यंत अनुक्रमे नाबाद ७०, २२, १६० आणि ५१ अशा धावांची नोंद केली आहे. साखळी फेरी आणि उपांत्य सामना मिळून एकूण चार सामन्यांच्या चार डावांत त्याच्या नावावर तब्बल ३०३ धावा जमा झाल्या आहेत. या कालावधीत त्याची फलंदाजीची सरासरी १०० हून अधिक राहिली असून, त्याने स्पर्धेत आतापर्यंत २९ चौकार आणि १६ षटकारांची आतषबाजी केली आहे. तसेच, त्याचा स्ट्राईक रेटदेखील ९५ पेक्षा अधिक राहिला आहे.
सुरू असलेल्या या स्पर्धेत आर्यवीर सेहवागने आपल्या फलंदाजीचे दोन्ही पैलू प्रभावीपणे दाखवून दिले आहेत. आक्रमक फटकेबाजीसोबतच त्याने आवश्यक तेथे कमालीचा संयमही बाळगला आहे. अनेक प्रसंगी त्याने अतिशय समजूतदारपणाने डाव सावरला असून, यूएईविरुद्धची खेळी हे त्याचे उत्तम उदाहरण ठरली. या सामन्यात त्याने १३१ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले आणि अखेरीस १६८ चेंडूंत १६० धावांची मॅरेथॉन खेळी करून तो बाद झाला.
आर्यवीर सेहवागचे १९ वर्षांखालील एकदिवसीय किंवा युथ वन-डे क्रिकेटमधील हे पहिलेच शतक ठरले. यापूर्वी त्याने विनू मांकड करंडक स्पर्धेत दिल्ली संघाचे नेतृत्व करतानाही अशीच नेत्रदीपक शतकी खेळी साकारली होती. त्या सामन्यात त्याने १४३ चेंडूंत ८ षटकार आणि १९ चौकारांच्या मदतीने १७३ धावा कुटल्या होत्या.
सद्यस्थितीत सुरू असलेल्या या स्पर्धेत ३०० धावांचा टप्पा ओलांडणारा आर्यवीर सेहवाग हा एकमेव फलंदाज ठरला असून, सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अग्रस्थानी विराजमान आहे. त्याने खेळलेल्या चारपैकी तीन डावांत पन्नासहून अधिक धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकाचा आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
आता अंतिम सामन्यात संपूर्ण क्रीडाविश्वाच्या नजरा त्याच्या कामगिरीवर खिळल्या आहेत. जेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार असून, आर्यवीरची या स्पर्धेतील पन्नासपेक्षा कमी धावांची एकमेव खेळी पाकिस्तानविरुद्धच्याच सामन्यात झाली होती; त्यामुळे अंतिम सामन्यात तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.