मँचेस्टर; वृत्तसंस्था : पायाच्या बोटाला फ्रॅक्चर असूनही ऋषभ पंतने दाखवलेले धाडस आणि त्याचे झुंजार अर्धशतक... यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने केलेला भेदक मारा! चौथ्या कसोटीच्या दुसर्या दिवशी याशिवाय इंग्लंडचे चोख प्रत्युत्तर हे देखील खेळाचे ठळक वैशिष्ट्य ठरले.
दिवसाच्या प्रारंभी पंतच्या धाडसी खेळीनंतरही स्टोक्सच्या प्रभावी गोलंदाजीमुळे (5/72) इंग्लंडने भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात आणला. प्रत्युत्तरात इंग्लंडने दिवसअखेर 2 बाद 225 असे चोख प्रत्युत्तर दिले. सलामीवीर झॅक क्राऊली (113 चेंडूत 84) व बेन डकेट (100 चेंडूत 94) यांची 166 धावांची सलामी यावेळी निर्णायक ठरली. दिवस अखेर पोप 20 तर जो रूट 11 धावांवर खेळत होते.
तत्पूर्वी, 4 बाद 264 या मागील धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात करणार्या भारताला दिवसाच्या दुसर्याच षटकात मोठा धक्का बसला. जोफ्रा आर्चरच्या बाहेर जाणार्या चेंडूवर रवींद्र जडेजा स्लिपमध्ये हॅरी ब्रूककडे झेल देऊन बाद झाला. ब्रूकने पुढे झेपावत अप्रतिम झेल घेतला.
यानंतर शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने सहाव्या गड्यासाठी महत्त्वपूर्ण 48 धावांची भागीदारी रचली. ही जोडी जम बसवत असतानाच कर्णधार बेन स्टोक्स गोलंदाजीला आला आणि त्याने शार्दूल ठाकूरला (41) गलीमध्ये डकेटकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. वॉशिंग्टन सुंदरला स्टोक्सनेच डकेटकरवी झेलबाद केले. त्यानंतर अंशुल कंबोज 0 खाते उघडण्यापूर्वीच यष्टीमागे स्मिथकडे झेल देत परतला, तर पंत 54 धावांवर आर्चरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. आर्चरनेच बुमराहला स्मिथकरवी झेलबाद केले आणि भारताचा पहिला डाव 114.1 षटकांत सर्वबाद 358 धावांवर आटोपला.
पहिल्या दिवशी पायाला चेंडू लागल्याने 37 धावांवर रिटायर्ड हर्ट झालेला ऋषभ पंत वेदना सहन करतच मैदानात उतरला. प्रेक्षकांनी उभे राहून त्याचे स्वागत केले. वेदना होत असूनही पंतने इंग्लिश गोलंदाजांचा धैर्याने सामना करत 75 चेंडूंत 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, दुसर्या बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही. स्टोक्सने तळाच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडत भारताचा डाव 358 धावांवर रोखला आणि इंग्लंडला सामन्यात दमदार पुनरागमन करून दिले.
शार्दूल ठाकूरने आजवर झळकावलेल्या 4 कसोटी अर्धशतकांपैकी 3 अर्धशतके इंग्लंडमधील आहेत. यातील 31 चेंडूंतील त्याचे अर्धशतक भारतातर्फे कसोटीत सर्वात दुसरे जलद अर्धशतक ठरले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये 10 शतके व पाच वेळा डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम आजवर केवळ चारच खेळाडूंना शक्य झाला आहे. गॅरी सोबर्स, इयान बोथम, जॅक कॅलिस व आता बेन स्टोक्स याचा यात समावेश आहे.
आर्चरने या मालिकेत आतापर्यंत 6 बळी घेतले असून, आश्चर्य म्हणजे हे सर्व फलंदाज डावखुरे आहेत.
चौथी कसोटी सुरू होण्यापूर्वी ख्रिस वोक्सने मँचेस्टरमध्ये 17.37 अशी सरासरी नोंदवली आहे. घरच्या मैदानावरील ही त्याची सर्वोत्तम सरासरी आहे.