पुढारी ऑनलाईन डेस्क : James Anderson in IPL : आयपीएल 2025 मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. BCCI ने नुकतीच IPL 2025 च्या लिलावात सहभागी झालेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यात एकूण 1574 खेळाडूंनी नावे नोंदवली आहेत.
ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, बेन स्टोक्सने लिलावासाठी आपले नाव दिले नाही. 2023 च्या मिनी लिलावात त्याला CSK ने 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते, पण IPL 2024 पूर्वी त्याचे नाव मागे घेतले होते. त्याच वेळी, इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आयपीएल लिलाव 2025 साठी आपले नाव नोंदवले आहे. त्याने त्याची मूळ किंमत 1.25 कोटी रुपये ठेवली आहे. गेल्या 13 आयपीएल सीझनमध्ये जेम्स अँडरसनने एकदाही आपले नाव लिलावासाठी नोंदवले नव्हते, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
वास्तविक, अँडरसन सध्या 42 वर्षांचा आहे. त्याने यापूर्वी आयपीएल 2011 आणि 2012 च्या लिलावादरम्यान लिलावासाठी नोंदवले होते, परंतु कोणत्याही फ्रँचायझीने त्याला दोन्ही हंगामात खरेदी करण्यात रस दाखवला नाही. त्यानंतर पुढच्या 13 हंगामातील लिलावासाठी त्याने एकदाही रस दाखवला नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तो तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे, ज्याने आजपर्यंत आयपीएलमध्ये पदार्पण केले नाही.
अँडरसन 2014 पासून टी-20 क्रिकेट खेळला नाही. त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण 19 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहेत, ज्यामध्ये त्याच्या नाववर 18 विकेट आहेत. त्याने शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 2009 मध्ये खेळला होता. त्याने आपल्या टी-20 करिअरमध्ये एकूण 44 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 41 विकेट घेतल्या आहेत.
1. दिल्ली कॅपिटल्स
जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट टी-२० लीग आयपीएलमध्ये ट्रॉफी जिंकण्याचे दिल्ली कॅपिटल्स संघाचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. यावेळी त्यांनी रिटेन ठेवलेल्या खेळाडूंमध्ये कोणत्याही मोठ्या स्टारला स्थान दिलेले नाही. अशा स्थितीत मेगा लिलावात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. त्यामुळे जेम्स अँडरसन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, जो गोलंदाजीसोबत युवा वेगवान गोलंदाजांसाठी मार्गदर्शकाची भूमिकाही बजावू शकतो.
2. पंजाब किंग्ज
आयपीएलमध्ये आतापर्यंत जेतेपदापासून वंचित राहिलेला पंजाब किंग्स नव्याने संघ तयार करणार आहे. पंजाबने फक्त 2 अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले आहे, त्यामुळे ते मेगा लिलावात अनेक बड्या खेळाडूंचा समावेश करू इच्छितात, ज्यात जेम्स अँडरसनवरही बोली लावण्याची शक्यता आहे. रिकी पाँटिंग हे संघाचे प्रशिक्षक असून त्यांनी अँडरसनची क्षमता अगदी जवळून पाहिली आहे. अशा स्थितीत पंजाब या इंग्लिश खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी इच्छुक असू शकतात.
3. चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएलच्या इतिहासात, चेन्नई सुपर किंग्स हा अशा संघांपैकी एक आहे ज्याने अनेकदा अनुभवी आणि वयस्कर खेळाडूंवर बोली लावली आहे. आता ते अँडरसनलाही टार्गेट करू शकतात. चेन्नईला ड्वेन ब्राव्होची पोकळी भरून काढायची आहे. त्यामुळे ते अँडरसनचा अनुभव लक्षात घेऊन त्याला आपल्या संघात घेऊ इच्छित असल्याचे समजते.