हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) आगामी हंगामापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. संघाचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू पायाच्या दुखापतीमुळे या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलियन वंशाच्या या खेळाडूला हैदराबादने ३ कोटी रुपयांच्या बोलीवर संघात सामील करून घेतले होते.
आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच अनेक परदेशी खेळाडूंनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. सॅम करन आणि नॅथन एलिस यांसारखे दिग्गज आधीच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत, तर पॅट कमिन्स, लॉकी फर्ग्युसन आणि जोश हेझलवूड हे खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हैदराबादला बसलेला हा धक्का अत्यंत कळीचा मानला जात आहे.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू जॅक एडवर्ड्स पायाच्या गंभीर दुखापतीमुळे आयपीएल २०२६ मध्ये खेळू शकणार नाही. २५ वर्षीय वेगवान गोलंदाज आणि फलंदाज असलेल्या जॅकवर हैदराबादने ३ कोटींची गुंतवणूक केली होती. विशेष म्हणजे, २०२६ च्या लिलावात खरेदी केला गेलेला तो एकमेव 'अनकॅप्ड' (आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेला) परदेशी खेळाडू होता. या हंगामात तो आयपीएलमध्ये पदार्पण करणार होता, मात्र दुखापतीमुळे त्याचे हे स्वप्न भंगले आहे.
जॅक एडवर्ड्सने 'बिग बॅश लीग २०२५-२६' मध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळताना अष्टपैलू कामगिरी केली होती. १३ सामन्यांत १९ बळी आणि १३३ धावा करत त्याने आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत मजल मारून दिली होती. या चमकदार कामगिरीच्या जोरावरच त्याला पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पणाची संधी मिळाली होती.
जॅक एडवर्ड्सची अनुपस्थिती हैदराबादसाठी डोकेदुखी ठरणार आहे, कारण नियमित कर्णधार पॅट कमिन्सदेखील वैयक्तिक कारणांमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही. कमिन्सच्या गैरहजेरीत यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे, तर युवा फलंदाज अभिषेक शर्मा याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जॅक एडवर्ड्सने शेफील्ड शील्डमध्ये न्यू साउथ वेल्सचे प्रतिनिधित्व करताना सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. आता त्याच्या जागी हैदराबाद संघ कोणत्या खेळाडूला संधी देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.