Jamie Spence Car Accident: Pudhari
स्पोर्ट्स

Cricketer Car Accident: 28 वर्षीय क्रिकेटपटूचा भीषण अपघातात मृत्यू; संघाने विजय समर्पित करत वाहिली श्रद्धांजली

Jamie Spence Car Accident: इंग्लंडचा 28 वर्षीय क्रिकेटपटू जेमी स्पेन्स याचा न्यूझीलंडमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात मृत्यू झाला. त्याच्या निधनाने ‘हुल स्ट्रायकर्स’ क्रिकेट क्लबवर शोककळा पसरली.

पुढारी वृत्तसेवा

इंग्लंडमधील युवा क्रिकेटपटू जेमी स्पेन्स याच्या निधनाने क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या 28 व्या वर्षी जेमीचा न्यूझीलंडमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत फ्रान्सचा नागरिक राफेल जीन-गॅब्रिएल रोलिंगर याचाही जागीच मृत्यू झाला. 29 एप्रिल रोजी न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडवरील किनलेथ परिसरात हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

जेमी स्पेन्स हा इंग्लंडमधील यॉर्कशायर भागातील रहिवासी होता आणि ‘हुल स्ट्रायकर्स’ या स्थानिक क्रिकेट क्लबचा महत्त्वाचा खेळाडू मानला जात होता. त्याच्या अचानक निधनामुळे संपूर्ण क्लब आणि स्थानिक क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. क्लबने सोशल मीडियावर भावनिक श्रद्धांजली वाहताना जेमीबद्दलच्या अनेक आठवणी शेअर केल्या.

क्लबच्या निवेदनात म्हटलं आहे की, “जेमी हा सुरुवातीपासूनच स्ट्रायकर्स कुटुंबाचा भाग होता. तो संघातील सर्वात लहान सदस्यांपैकी एक असला तरी त्याच्यात प्रचंड ऊर्जा, उत्साह आणि खेळाबद्दल अफाट प्रेम होतं. मैदानात आणि मैदानाबाहेर तो कायम सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायचा.”

संघाने पुढे म्हटलं, “जेमीचं हास्य, त्याचा सकारात्मक स्वभाव आणि क्रिकेटवरील निस्सीम प्रेम आमच्या क्लबमध्ये कायम उत्साह निर्माण करायचं. त्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही.”

जेमीच्या निधनानंतर काही दिवसांनी हुल स्ट्रायकर्सचा हेसल क्रिकेट क्लबविरुद्ध सामना होता. दुःखाच्या वातावरणातही संघाने सामना खेळण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, फक्त 10 खेळाडू असून मैदानात उतरलेल्या हुल स्ट्रायकर्सने हा सामना सात धावांनी जिंकला. संघाने हा विजय आपल्या दिवंगत सहकाऱ्याला समर्पित केला.

या सामन्यासाठी जेमीचे वडील जॉन स्पेन्स मैदानात उपस्थित होते. त्यावेळी वातावरण अत्यंत भावनिक झालं होतं. सामना संपल्यानंतर खेळाडूंनी जेमीच्या आठवणींना उजाळा देत त्याला खास श्रद्धांजली अर्पण केली.

संघाने आपल्या मेसेजमध्ये शेवटी लिहिलं, “हा विजय तुझ्यासाठी आहे जेमी… मैदानावर तू नेहमी जसं सर्वस्व पणाला लावून खेळायचास, तसंच आम्ही खेळलो. तू कायम या संघाचा भाग राहशील… Forever a Striker.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT