रवींद्र जडेजा Pudhari File Photo
स्पोर्ट्स

‘वन अँड ओन्ली’ रवींद्र जडेजा

पुढारी वृत्तसेवा

कानपूर, वृत्तसंस्था : क्रिकेटच्या इतिहासात जी गोष्ट कोणत्याही क्रिकेटपटूला जमली नाही, ती गोष्ट आता फक्त भारताच्या रवींद्र जडेजाच्या नावावर आहे. त्यामुळे रवींद्र जडेजाच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डसह ही ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही संघातील खेळाडूने विजयामध्ये 2000 धावा आणि 200 पेक्षा जास्त विकेटस् असे योगदान दिलेले नाही. फक्त जडेजा हाच क्रिकेट विश्वातील असा एकमेव खेळाडू आहे, ज्याने ही कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे जडेजाच्या एकट्याच्याच नावावर हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात ही गोष्ट कोणालाही जमलेली नाही. क्रिकेट विश्वात 2550 सामने खेळवले गेले. आतापर्यंत 3187 खेळाडू खेळले; पण आतापर्यंत जगभरातील कोणत्याही क्रिकेटपटूला जी गोष्ट कधीही जमली नाही, ती गोष्ट आता जडेजाच्या नावावर आहे. कसोटी सामन्यांचा विचार केला, तर भारताच्या विजयात जडेजाचे सर्वात जास्त योगदान राहिलेले आहे. जडेजाने भारताच्या कसोटी विजयात 2003 धावा केल्या आहेत, तर त्याने 216 विकेटस् मिळवल्या आहेत.

अश्विनलाही असणार संधी...

अश्विनही या जडेजाच्या यादीत सामील होऊ शकतो. अश्विनने आतापर्यंत भारताच्या विजयात 1942 धावा केल्या आहेत, तर 369 विकेटस् मिळवलेल्या आहेत. त्यामुळे जडेजानंतर या यादीत आता अश्विनचाही लवकरच समावेश होऊ शकतो, असे आता म्हटले जात आहे.

जडेजाची काय आहे खासियत?

जडेजा हा भारताचा ‘हुकमी एक्का’ समजला जातो. रवींद्र जडेजाची गोलंदाजी अचूक असते. तो टिच्चून मारा करण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सर्वात कमी वेळेत षटक जडेजा टाकतो. त्याचबरोबर जेव्हा संघाला धावांची गरज असते, तेव्हा जडेजा दमदार फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू भारतासाठी महत्त्वाचा आहे. चेन्नईतील पहिल्या कसोटीत जडेजाने नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळेच आता जडेजा एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. सर्व द़ृष्टीने पाहिले, तर जडेजा हा भारतीय संघासाठी एक उपयुक्त खेळाडू आहे; पण आता तो यापुढे टी-20 क्रिकेट खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT