पॅरिस सेंट जर्मन अर्थात ‘पीएसजी’ संघाने युफा चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या इतिहासातील पहिलेवहिले जेतेपद खेचून आणत नवा इतिहास रचला. शनिवारी उत्तररात्री अॅलियान्झ एरेनावर रंगलेल्या निर्णायक अंतिम लढतीत पॅरिस सेंट-जर्मेनने इंटर मिलानला 5-0 ने हरवून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यासह, ‘पीएसजी’ने क्लबच्या इतिहासातील पहिला ट्रेबलही पूर्ण केला. फुटबॉलमध्ये एकाच हंगामात तीन प्रमुख स्पर्धा जिंकल्यास त्याला ट्रेबल असे ओळखले जाते.
‘पीएसजी’ने जेतेपद पटकावल्यानंतर संघाच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. मात्र, हा उत्साह लवकरच हिंसक दंगलींमध्ये बदलला. ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक गंभार जखमी झाले आहेत. पोलिसांनी या दंगलीप्रकरणी 559 जणांना अटक केली आहे.
रॉयटर्सने रविवारी गृह मंत्रालयाचा हवाला देत म्हटले आहे की, पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण 559 लोकांना अटक केली आहे. यात पॅरिसमध्ये अटक केलेल्या 491 लोकांचा समावेश आहे. त्यातील 320 लोकांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले.
मंत्रालयाने म्हटले आहे की, रस्त्यालगत लहान दुकाने असलेल्या एक गल्लीत हजारो लोक एकत्र झाले. गर्दी सतत वाढत होती. त्यांना प्रथम शांतता आणि शिस्त राखण्याचे आवाहन करण्यात आले. पण त्यांनी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे जाणवताच अश्रूधुराचा वापर आणि पाण्याच्या मारा करण्यात आला.
गृह मंत्रालयाने शेकडो आगी लावल्याची पुष्टी केली. या आगीत 200 हून अधिक वाहने जळून खाक झाली. सुरक्षा दलाचे 22 सदस्य आणि सात अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले. गृह मंत्रालय संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. सध्या पॅरिसमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखली जात असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.
‘पीएसजी’ने पहिल्या 20 मिनिटांतच माजी इंटर खेळाडू अशरफ हकिमी आणि 19 वर्षीय युवा खेळाडू डिजायर डो यांच्या गोलांमुळे 2-0 अशी आघाडी घेतली आणि हीच आघाडी सामन्याचे चित्र बदलणारी ठरली. डिजायरने दुसर्या सत्रात आणखी एक गोल करत संघाला 3-0 अशी भक्कम स्थितीत आणले. जॉर्जियन फॉरवर्ड क्विचा क्वारत्सखेलियाने चौथा गोल केला, तर बदली खेळाडू सेन्नी मायुलुने पाचवा गोल नोंदवला. ‘पीएसजी’चे व्यवस्थापक लुईस एनरिके यांच्या कारकिर्दीतील हे दुसरे ट्रेबल आहे.
दुसरीकडे, इंटर मिलानला तीन वर्षांत दुसर्यांदा युफा चॅम्पियन्स लीग फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. इंटर मिलानचा संघ यंदा सिरी ए स्पर्धेत नापोलीपाठोपाठ एका गुणाने पिछाडीवर राहिले, तर कोपा इटालियात त्यांना उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता.
‘पीएसजी’चा कर्णधार मार्क्विन्होस मागील 12 वर्षांपासून या संघासमवेत असून, अखेर बुधवारी त्याला युरोपमधील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकण्याचा मान प्राप्त झाला. या क्लबचे अध्यक्ष नासेर अल खेलाफी यांना सर्व संघ सहकार्यांनी उचलून घेत या विजयाचा आनंद अगदी थाटात साजरा केला.
लुईस एनरिके यांनी अलीकडील कालावधीत ‘पीएसजी’ संघासाठी बरीच मेहनत घेतली आहे. नेमार, मेस्सीसारखे मोठे खेळाडू संघात नसताना आणि कायलिन एम्बापेने संघाला अलविदा केल्यानंतर ‘युफा’चे जेतेपद काबीज करणे हे स्वप्नवत होते; पण एनरिके यांनी त्यात यश मिळवले.