ठळक मुद्दे :
भारतीय टेनिसपटू लिअँडर पेस यांचे वडील डॉ. व्हेस पेस यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन.
१९७२ च्या म्युनिच ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य.
क्रीडा, वैद्यकीय आणि क्रीडा प्रशासन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान.
भारताचे माजी हॉकीपटू आणि 1972 म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य डॉ. व्हेस पेस यांचे गुरुवारी (14 ऑगस्ट) कोलकातामध्ये निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. ते पार्किन्सन आजाराने ग्रस्त होते.
डॉ. व्हेस पेस हे भारताचे प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांचे वडील होते. लिएंडर यांनी 1996 अटलांटा ऑलिम्पिकमध्ये टेनिस एकेरीत कांस्यपदक जिंकले होते. डॉ. व्हेस पेस यांनी हॉकीसह क्रीडा वैद्यकशास्त्र क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या पत्नी जेनिफर पेस या भारतीय बास्केटबॉल संघाच्या माजी कर्णधार होत्या.
डॉ. व्हेस पेस यांच्या निधनाने क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
डॉ. व्हेस पेस यांनी विभागीय स्तरावर क्रिकेट, फुटबॉल आणि रग्बी या खेळांमध्येही आपले कौशल्य दाखवले. १९९६ ते २००२ या कालावधीत त्यांनी 'इंडियन रग्बी फुटबॉल युनियन'चे अध्यक्षपद भूषवले. जगातील सर्वात जुन्या क्रीडा क्लबांपैकी एक असलेल्या 'कलकत्ता क्रिकेट अँड फुटबॉल क्लब'चेही ते अध्यक्ष होते.
डॉ. व्हेस पेस यांचा जन्म १९४५ साली गोव्यात झाला. प्रसिद्ध बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त यांच्या पणती आणि भारताच्या माजी बास्केटबॉलपटू जेनिफर दत्त या त्यांच्या पत्नी होत. त्यांचा मुलगा, लिअँडर पेस यानेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत टेनिसमध्ये ऑलिम्पिक पदक पटकावले. याव्यतिरिक्त, त्यांनी एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्यासोबतही काम केले.