Taipei Open | १७ वर्षीय तन्वी शर्माने जिंकले तैपेई ओपन; सायनानंतर महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय 
स्पोर्ट्स

Taipei Open | १७ वर्षीय तन्वी शर्माने जिंकले तैपेई ओपन; सायनानंतर महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय

:17 साल की तन्वी शर्मा ने रचा इतिहास, 18 साल बाद ...

पुढारी वृत्तसेवा

तैपेई; वृत्तसंस्‍था : भारताची १७ वर्षीय उदयोन्मुख बॅडमिंटनपटू तन्वी शर्माने तैपेई ओपन सुपर ३०० स्पर्धेत रविवारी महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला. अंतिम सामन्यात तिने व्हिएतनामच्या अनुभवी खेळाडू थुय लिन न्गुयेन हिचा सरळ गेममध्ये पराभव करत आपल्या कारकिर्दीतील पहिलेवहिले ‘बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर’ विजेतेपद पटकावले. २००८ मध्ये सायना नेहवालने हे जेतेपद मिळवले होते, त्यानंतर ही ऐतिहासिक कामगिरी करणारी पंजाबची तन्वी ही पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे.

अवघ्या ३६ मिनिटांत जेतेपदावर शिक्‍कामोर्तब

गेल्या वर्षीच्या ‘यूएस ओपन सुपर ३००’मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या तन्वीने यंदा कोणतीही चूक केली नाही. अंतिम सामन्यात तिने व्हिएतनामच्या सहाव्या मानांकित थुय लिन न्गुयेनचा २१-१६, २१-१६ असा अवघ्या ३६ मिनिटांत धुव्वा उडवला.

तन्वी तैपेई ओपनच्या इतिहासातील सर्वात तरुण अंतिम फेरी गाठणारी खेळाडू

१७ वर्षे आणि २२२ दिवसांची तन्वी तैपेई ओपनच्या इतिहासातील सर्वात तरुण अंतिम फेरी गाठणारी खेळाडू ठरली. तिने २००६ मध्ये पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या दक्षिण कोरियाचे दिग्गज ली योंग डे यांचा विक्रम मोडला. तैपेई ओपनचे विजेतेपद जिंकून, तिने भारतीय बॅडमिंटनच्या भविष्यासाठी एक नवी आशा म्हणून आपले स्थान अधिक पक्के केले आहे.

कोचलाच घातले सुवर्णपदक; तन्वी शर्माच्या यशाने भावुक क्षण

विजेतेपद पटकावल्यानंतर तन्वी शर्माने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. पदक वितरण समारंभात तिने आपल्या गळ्यातील सुवर्णपदक काढून ते थेट आपल्या प्रशिक्षक पार्क ताए-सांग यांच्या गळ्यात घातले. त्यानंतर दोघांनी एकत्र छायाचित्रे काढत हा संस्मरणीय क्षण साजरा केला. या दृश्याला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT