पाटणा : आगामी रणजी करंडक हंगामातील पहिल्या 2 सामन्यांसाठी बिहार संघाने 14 वर्षीय फलंदाजीतील उदयोन्मुख तारा वैभव सूर्यवंशी याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. या संघाचे नेतृत्व साकिबुल गनी करेल. बिहार क्रिकेट असोसिएशनने रविवारी रात्री उशिरा संघाची घोषणा केली.
बिहारचा प्लेट लीगचा पहिला सामना बुधवारी (दि. 15) मोईन-उल-हक स्टेडियमवर अरुणाचल प्रदेशा विरुद्ध होणार आहे. मागील रणजी हंगामात एकही विजय न मिळवल्याने बिहारची प्लेट लीगमध्ये घसरण झाली होती. वैभव सूर्यवंशी हा मूळचा बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी आहे.
सूर्यवंशीने 2023-24 च्या हंगामात वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी रणजी करंडक क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर, इंडियन प्रीमियर लीग (करार मिळवणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याला राजस्थान रॉयल्सने या वर्षाच्या हंगामापूर्वी संघात समाविष्ट केले, तेव्हा त्याचे वय 13 वर्षे होते. त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यांसाठीच्या भारतीय 19 वर्षांखालील संघातही सहभाग घेतला आहे.
राजस्थान रॉयल्सकडून खेळताना गुजरात टायटन्स विरुद्ध त्याने अवघ्या 35 चेंडूंमध्ये शतक झळकावले. टी-20 क्रिकेटमध्ये शतक करणारा तो पुरुषांच्या क्रिकेटमधील सर्वात तरुण खेळाडू (14 वर्षे) ठरला. आयपीएलमधील हे दुसरे सर्वात जलद शतक होते.
पुढील वर्षी झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता असल्याने सूर्यवंशी बिहारसाठी संपूर्ण हंगाम खेळण्याची शक्यता कमी आहे.
पीयूष कुमार सिंग, भास्कर दुबे, साकिबुल गनी (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अर्णव किशोर, आयुष लोहारुका, बिपिन सौरभ, आमद यादव, नवाज खान, साकिब हुसेन, राघवेंद्र प्रताप सिंग, सचिन कुमार सिंग, हिमांशू सिंग, खालिद आलम, सचिन कुमार.