पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारकडून खेळणारा 13 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने मंगळवारी (दि.31) विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोद्याविरुद्ध धडाकेबाज खेळ केला. वैभवने 2024 हे वर्ष दणक्यात संपवण्यात यश मिळवले. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बडोदाविरुद्ध बिहारच्या डावाची सुरुवात करताना वैभवने 42 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकारांसह 71 धावांची धमाकेदार खेळी केली. वैभवने आपल्या संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि सामन्यात सर्वाधिक स्ट्राइक रेट (169.04) धावा करणारा फलंदाज होता. वैभवचे लिस्ट ए कारकिर्दीतील हे पहिले अर्धशतक होते. यासह लिस्ट ए क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा वैभव सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला. वैभवच्या या शानदार खेळीनंतरही बिहारला या गट-ई सामन्यात 36 धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
मध्य प्रदेश विरुद्ध विजय हजारे ट्रॉफीच्या चालू हंगामात लिस्ट ए मध्ये पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला. त्याने वयाच्या 13 वर्षे आणि 269 दिवसांत पहिला लिस्ट ए सामना खेळला होता. 2025 च्या आयपीएल हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने त्याला 1.10 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. आयपीएलचा 18वा सीझन सुरू होण्यापूर्वी आजकाल वैभवज्या प्रकारे फलंदाजी करत आहे ते राजस्थान रॉयल्ससाठी चांगले संकेत आहे.
या सामन्यात कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाला 49 षटकात 277 धावा करता आल्या. विष्णू सोलंकीने 109 चेंडूत 102 धावांची शतकी खेळी खेळली. त्यांच्याशिवाय शिवालिक शर्माने 39 धावांची तर अतित सेठने 36 धावांची खेळी खेळली. बिहारकडून अमोल यादवने 38 धावांत सर्वाधिक 4 बळी घेतले. त्याच्याशिवाय रघुवेंद्र प्रताप सिंगने 2 बळी घेतले. सुरज कश्यप, शकिबुल घनी आणि हिमांश सिंग यांनी 1-1 असे यश मिळवले.
विजयासाठी 278 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुमार रजनीश आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी बिहारच्या डावाची सलामी देण्यासाठी आली. दोघांनीही वेगवान फलंदाजी करत 5 षटकात 40 धावा जोडल्या. सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सेठने रजनीशला पायचीत केले पण वैभव दुसऱ्या टोकाला राहिला आणि आतिशी फलंदाजी करत राहिला. दुसऱ्या विकेटसाठी त्याने मंगल महरोरच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी करत धावसंख्या 100 धावांपर्यंत नेली. या काळात वैभवने आपले अर्धशतक पूर्ण केले मात्र 13व्या षटकातील पाचव्या चेंडूवर विरोधी कर्णधार कृणाल पांड्याने त्याचा डाव संपवला.
वैभवने बिहारला चांगली सुरुवात करून दिली मात्र त्यानंतरच्या फलंदाजांना या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. संपूर्ण संघाला 50 षटकात 9 गडी गमावून 241 धावा करता आल्या. कर्णधार शकिबुल घनीने 43(82) आणि यष्टिरक्षक फलंदाज बिबिन सौरभने 40(42) धावा केल्या. बिहारने हा सामना 36 धावांच्या फरकाने गमावला. बडोद्यातर्फे निनाद राठवाने सर्वाधिक 4 बळी घेतले. भार्गव भट्ट यांना यश मिळाले. अतित सेठ, महेश पिठिया आणि कृणाल पंड्या यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.