Twitter
स्पोर्ट्स

टीम इंडियाने रचला इतिहास! उद्ध्वस्त केला पाकिस्तानचा विश्वविक्रम

T-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणा-या खेळाडूंची संख्या 117

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs Bangladesh T20 Series : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाची प्रत्येक चाल बरोबर ठरली. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. बांगलादेशचा संघ अवघ्या 127 धावांवर गारद झाला. यानंतर भारतीय संघाने या लक्ष्याचा सहज पाठलाग केला. हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग यांनी टीम इंडियासाठी अप्रतिम कामगिरी केली. या खेळाडूंमुळेच भारतीय संघ मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्यात यशस्वी ठरला.

मयंक यादव आणि नितीश रेड्डी यांचे पदार्पण

कर्णधार सूर्याने उदयोन्मुख आयपीएल गोलंदाज मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांना पदार्पणाची संधी दिली. यासह भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणा-या खेळाडूंची संख्या 117 वर पोहचली आहे. याबाबतीत भारताने पाकिस्तानचा विश्वविक्रम मोडला असून पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. पाकिस्तानकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 116 खेळाडू खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत एकूण 111 खेळाडूंनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

T-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक खेळाडूंचे पदार्पण करणारे संघ

टीम इंडिया : 117 खेळाडू

पाकिस्तान : 116 खेळाडू

ऑस्ट्रेलिया : 111 खेळाडू

श्रीलंका : 108 खेळाडू

द. आफ्रिका : 107 खेळाडू

इंग्लंड : 104 खेळाडू

न्यूझीलंड : 103 खेळाडू

वरुण चक्रवर्तीची अप्रतिम गोलंदाजी

22 वर्षीय मयंक यादवने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच षटक निर्धाव टाकले. यानंतर दुसऱ्या षटकात त्याने विकेट घेतली. भारतीय प्लेईंग इलेव्हनमध्ये 3 वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या वरुण चक्रवर्तीने तीन बळी घेतले. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंगने 3.5 षटकांत 3 बळी घेतले. या गोलंदाजांसमोर बांगलादेशी फलंदाजांना यश मिळाले नाही आणि संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही.

हार्दिक पंड्याची शानदार खेळी

संजू सॅमसनने संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्याने 29 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादवने 14 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 29 धावा केल्या. हार्दिक पंड्याने षटकार ठोकत संघाला विजयाकडे नेले. त्याने उत्कृष्ट खेळी खेळली आणि 16 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. आपल्या खेळीदरम्यान हार्दिकने 5 चौकार आणि 2 षटकार मारले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT