Latest

महासंस्कृती महोत्सावात दिवसागणीक धुळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंजली राऊत

धुळे : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई जिल्हा प्रशासन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी राईझिंग स्टार रॉक बॅण्ड, खान्देशी बाणा गीत, गायन, नृत्य व 'वारी सोहळा संतांचा' या भावभक्तीपर गीतांनी महासंस्कृती महोत्सवाचा तिसरा दिवस गाजविला. धुळेकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरत असलेल्या महासंस्कृती महोत्सावात दिवसागणीक धुळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिनव गोयल,मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, सीमा अहिरे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व धुळेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात अजिंक्य बगदे व सहकारी, धुळे यांनी राइझिंग स्टार रॉक बॅण्ड, लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था, धुळे यांनी खान्देशी बाणा कार्यक्रमात पारंपरिक कानुबाईची गाणे सादर केली. तर ओमकार वसुधा व अशोक सांवत, मुंबई यांनी 'वारी सोहळा संतांचा' या भक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज, पंढरीचा विठ्ठल आदि संतांच्या जीवनातील विविध रूपे तसेच महाराष्ट्राच्या वारीची परंपरा हुबेहुब सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

महासंस्कृती महोत्सवातील आजचे कार्यक्रम
शुक्रवार, 1 मार्च, 2024 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजता 'शाहीरी जलसा'हा कार्यक्रम महात्मा फुले कृषक मंडळ व बहुउद्देशिय संस्था, त-हाडी, ता.शिरपूर हे सादर करतील. सकाळी 10.30 ते 10.50 वाजता 'बेलसर स्वारी'हा कार्यक्रम कृष्ण नगर हायस्कुल, धुळेचे विद्यार्थी सादर करतील. सकाळी 10.50 ते 1 वाजता धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी हे 'कवी संमेलन'सादर करतील.

सायंकाळी 5 ते 7 वाजता परिवर्तन, जळगाव हे 'अरे संसार संसार (संगीत व नाट्य)' सादर करतील. सायंकाळी 7 ते 7.30 वाजता जिल्हा प्रशासनामार्फत 'समारोप कार्यक्रम' होईल. सायंकाळी 7.30 ते 10 वाजता 'शब्द सुरांची भावयात्रा'हा कार्यक्रम मुंबई येथील भिमराव पाचाळ व सहकारी सादर करतील. या कार्यक्रमांला धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महासंस्कृती महोत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT