अलीकडच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे स्पाँडिलायटिसच्या व्याधीचे प्रमाण चांगलेच वाढू लागले आहे. या व्याधीवर उपचार करणे आजकाल सोपे झाले आहे. उपचारांबरोबरच आपल्या उभ्या राहण्याच्या, चालण्याच्या, बसण्याच्या आणि झोपण्याच्या सवयींकडेही लक्ष ठेवले तर या व्याधीची तीव्रता कमी होते.
स्पाँडिलायटिस या व्याधीवर ट्रॅक्शनचा उपचारही फायदेशीर ठरू शकतो. सध्या या उपचाराचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. ट्रॅक्शनमुळे स्पाँडिलायटिसवर शंभर टक्के मात करता येत नसली तरी या व्याधीमुळे होणार्या वेदना कमी करण्यात यश येते. त्यामुळे डॉक्टरांकडून रुग्णांवर ट्रॅक्शनचे उपचार सर्रास केले जातात. ट्रॅक्शनही खूप जुनी अशी उपचार पद्धती आहे. मणक्याच्या हाडातील अंतर वाढल्यास किंवा कमी झाल्यास हाडांची स्थिती पूर्ववत करण्यासाठी ट्रॅक्शनद्वारे उपचार केले जातात.
ट्रॅक्शन दोन प्रकारे घेतले जाते. सर्व्हायकल ट्रॅक्शन आणि लंबर ट्रॅक्शन. सर्व्हायकल ट्रॅक्शनमध्ये रुग्णाच्या मानेच्या आसपास असणार्या भागाला यांत्रिक पद्धतीने मसाज केला जातो. रुग्णाला बसवून अथवा झोपावयास लावून त्याच्या शरीराच्या संबंधित भागावर गुरुत्वाकषर्णाविरोधात दाब टाकला जातो.
लंबर ट्रॅक्शन या प्रकारामध्ये रूग्णाच्या कमरेच्या वरच्या आणि खालच्या भागावर दाब टाकला जातो. या उपचारामुळे मणक्यामधील हाडांची स्थिती पूर्ववत होण्यास मदत होते. या उपचारांमुळे रूग्णांमधील सांध्याची दुखणीही कमी होतात असे वैद्यकीय संशोधनाद्वारे दिसून आले आहे. ज्यावेळी रुग्णाचा स्पाँडिलायटिस हा तिसर्या टप्प्यात असतो, तेव्हा ट्रॅक्शनचा उपचार केला जातो. स्थिती यापेक्षाही बिघडल्यास शस्त्रक्रिया करणे हा एकमात्र मार्ग शिल्लक राहातो.
डॉ. भारत लुणावत