Latest

SpiceJet flight | थरारक घटना! गोव्याहून निघालेल्या स्पाइसजेट विमानाचे हैदराबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

दीपक दि. भांदिगरे

हैदराबाद : पुढारी ऑनलाईन डेस्क : गोव्यातून आलेल्या स्पाइसजेटच्या विमानाचे (SpiceJet flight) हैदराबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या कॉकपिटमध्ये धूर दिसून आल्यानंतर हे विमान तातडीने हैदराबादमध्ये उतरवण्यात आले. "गोव्याहून हैदराबादला जाणाऱ्या स्पाइसजेट Q400 विमानाच्या कॉकपिटमध्ये धूर दिसल्यानंतर त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले," असे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितले की या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे. विमानाच्या आपत्कालीन लँडिंगनंतर प्रवाशांना आपत्कालीन मार्गातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यादरम्यान एका प्रवासी किरकोळ जखमी झाला. स्पाइसजेट Q400 या विमानाने गुरुवारी सकाळी गोव्यातून उड्डाण केले होते आणि ते हैदराबादमध्ये उतरले. विमान रिमोट गेटकडे नेण्यात आले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले.

स्पाइसजेटला अलिकडच्या काही महिन्यांत सुरक्षेशी संबंधित अनेक घटनांचा सामना करावा लागत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) उन्हाळ्यातील विमान वाहतुकीवर ५० टक्क्यांची मर्यादा लागू केली आहे. स्पाइसजेट एअरलाइनमध्ये वारंवार हवाई सुरक्षेशी संबंधित घटना घडल्यानंतर DGCA ने २७ जुलै रोजी स्पाइसजेटच्या उड्डाणांवर आठ आठवड्यांसाठी निर्बंध घातले होते. गेल्या महिन्यात या निर्बंधाचा कालावधी एक महिन्याने वाढवून २९ ऑक्टोबरपर्यंत केला होता.

दिल्लीत गेल्या जुलै महिन्यात अशीच मोठी विमान दुर्घटना टळली होती. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (आयजीआय) जबलपूरच्या दिशेने उड्डाण घेतलेल्या एका स्पाइसजेटच्या विमानाचे (SpiceJet flight) आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. ५ हजार फुटांवर असताना विमानामध्ये अचानक धूर दिसून आला. यावेळी स्पाइसजेटच्या एसजी-२९६२ विमानात १०० हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. त्याआधी १९ जून रोजी स्पाइसजेटच्या पटना-दिल्ली विमानात इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागली होती. या विमानात १८५ प्रवासी विमानात प्रवास करीत होते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT