दिव्यांगांची दिव्य भरारी 
Latest

दिव्यांगांची दिव्य भरारी

Arun Patil

देशातील पॅरा अ‍ॅथेलिटला प्रोत्साहन देण्यासाठी या महिन्यात 'खेलो इंडिया पॅरा गेम्स'चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील खेळाडूंचा उत्साह आणि कामगिरी पाहता, ते आता कोणाच्याही मागे राहू शकत नाहीत, हे सिद्ध झाले आहे. आपल्याकडे ग्रामीण भागात शारीरिक दिव्यांगता, व्यंग्यतेची खिल्ली उडविली जाते. हा विचार संकुचित मनोवृत्तीचा भाग आहे. पॅरा गेम्समध्ये मुलांनी केलेली अचाट कामगिरी ही अशा कुचेष्टांना दिलेली सणसणीत चपराक आहे. यामुळे लोकांची मानसिकताही बदलू लागली आहे.

इच्छाशक्ती मजबूत असेल, तर सर्वकाही मिळवता येणे शक्य आहे. ही बाब गेल्या काही वर्षांत दिव्यांग खेळाडूंनी सिद्ध करून दाखविली आहे. पॅरा खेळाडूंनी मेहनतीच्या जोरावर आणि इच्छाशक्तीच्या बळावर देशाच्या गौरवात भर घातली आहे. हे खेळाडू देशातील दिव्यांगांसाठी प्रेरणास्थान बनत आहेत. दुसरीकडे, बदलत्या भारतीय समाजाचे प्रतीकही ठरत आहे. एकेकाळी ग्रामीण भागात अवहेलना सहन करणारे दिव्यांग तरुण-तरुणी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. देशातील पॅरा अ‍ॅथेलिटला प्रोत्साहन देण्यासाठी या महिन्यात 'खेलो इंडिया पॅरा गेम्स'चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील खेळाडूंचा उत्साह आणि कामगिरी पाहता, ते आता कोणाच्याही मागे राहू शकत नाहीत, हे सिद्ध झाले आहे. स्पर्धेनिमित्ताने बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'खेलेगे, तो खिलोगे' ही बाब दिव्यांग खेळाडूंच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत आहे.

या स्पर्धेत दोन्ही हात नसलेली नेमबाज शीतल देवी यांची कामगिरी पाहून तर सर्व जण थक्क झाले. अशा कामगिरीची कल्पना कोणीही केलेली नसेल. जम्मू काश्मीरच्या किश्तवाड येथील दुर्गम भागातील लोई धार गावात जन्मलेल्या शीतल देवी यांना जन्मजात हात नव्हते. हा पालकांना तर धक्का होताच; परंतु शीतल देवी यांच्यासमोर तर आयुष्य होते. पण, लोकांच्या मानसिकतेत बदल झाल्याचे दिसून येत आहे. कटरा येथील माता वैष्णोदेवी देवस्थान मंडळाची नेमबाजांसाठी अकादमी आहे. लष्कराच्या एका अधिकार्‍याने दोन वर्षांपूर्वी या अकादमीचे प्रशिक्षक कुलदीप यांना शीतलविषयी सांगितले. त्यांच्यासाठी पाय आणि छातीने चालविण्यात येणार्‍या धनुष्याची निर्मिती तयार करण्यात आली आणि हे प्रयत्न एका यशस्वी खेळाडूच्या रूपातून फळाला आले.

'खेलो इंडिया पॅरा गेम्स'मध्ये यश मिळवणारे थाळीफेकपटू योगेश कथुरिया, टेबल टेनिस स्टार भवीना पटेल, पारूल परमार किंवा संदीप डांगी यांची कामगिरी रोमहर्षक आहे. वास्तविक, या खेळाडूंनी शारीरिक व्यंग्याला आयुष्यभराचा दोष मानणण्याऐवजी त्याच्यावर मात करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तिरंगा ध्वज फडकविण्याचा निर्धार केला. पॅरा गेम्समध्ये मुलांनी केलेली अचाट कामगिरी ही अशा कुचेष्टांना दिलेली सणसणीत चपराक आहे. यामुळे लोकांची मानसिकताही बदलू लागली आहे. हांगझू पॅरा आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या कृष्णा नागरलाही समाजाची अवहेलना सहन करावी लागली होती. त्यांची उंची चार फूट आणि पाच इंच आहे. यावेळी त्यांच्या घराजवळ राहणार्‍या लोकांनी त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण, तेच आज कृष्णाचे चाहते बनले आहेत.

पॅरा गेम्समधील यश मिळवणारे प्रमोद भगत यांनी पॅरा आशियाई खेळात पदकांचे शतक गाठल्यानंतर सांगितले, 'हे यश एका दिवसाचे नसून, अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर लाभले आहे.' 2016 च्या रिओ पॅरालिंपिकमध्ये देवेंद्र झाजरिया आणि मरियप्पन थंगावेलू यांनी सोनेरी यश मिळवल्यानंतर लोकांचे लक्ष त्यांच्याकडे जाऊ लागले आणि याद़ृष्टीने देशाची योग्य प्रगती होऊ लागली. भारताला पॅरा गेम्समध्ये पुढे नेण्यात भारतीय पॅरालिंपिक समितीच्या दीपा मलिक यांचाही मोलाचा वाटा आहे. दीपा या स्वत: पॅरा अ‍ॅथलिट आहेत आणि त्यांनी ही जबाबदारी सांभाळल्यानंतर अ‍ॅथलिट खेळाडूंना शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांना सरकारकडूनदेखील पाठबळ मिळाले आहे. या क्षेत्रात मिळणारे यश पाहता, त्याचा संपूर्ण लाभ भारतीय समाजाला होत आहे आणि ही तर आता कोठे सुरुवात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT