IND vs SA Test 2nd Day: सेंच्युरियन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रंगाला पावसाचा ‘खेळ’! 
Latest

IND vs SA Test 2nd Day: सेंच्युरियन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रंगाला पावसाचा ‘खेळ’!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA Test 2nd Day : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळावर पाऊस आणि खराब प्रकाशाचा परिणाम झाला. सेंच्युरियन येथे सोमवारी दिवसभर पाऊस पडला, त्यामुळे एकही ओव्हरचा खेळ झाला नाही. त्यामुळे पंचांनी आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र,पंचांनी अतिशय घाईघाईने हा निर्णय घेतल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पण, आउटफिल्डमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हा निर्णय रास्त असल्याचे पंचांचे म्हणणे आहे.

भारतीय संघाची पहिल्या कसोटीत दमदार सुरुवात…

दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या कसोटीत दमदार सुरुवात केली आहे. रविवारी पहिल्या दिवशी सलामीवीर के. एल. राहुलच्या मस्त मस्त शतकाच्या जोरावर भारताने 3 बाद 272 अशी जबरदस्त कामगिरी केली आहे. कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावणारा राहुल 122 धावांवर नाबाद असून, अजिंक्य रहाणे 40 धावांवर त्याला साथ देत आहे.

मयंक अग्रवालनेही अर्धशतक झळकावताना 60 धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहली 35 धावांवर बाद झाला. तर, चेतेश्‍वर पुजाराच्या नशिबी भोपळा आला. द. आफ्रिकेचा एन्गिडी (3/45) हा एकमेव यशस्वी गोलंदाज ठरला.

तत्पूर्वी, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या सत्रात एकही गडी बाद होऊ न देता 83 धावांची खेळी केली. दुसर्‍या सत्रात लगेचच मयंकने दमदार अर्धशतक ठोकले. तसेच, संघानेही शतक गाठले. मार्को जॅन्सेनच्या 29.1 व्या षटकात मयंक अग्रवालने चौकार लगावून आपले अर्धशतक पूर्ण केले.


भारताची सलामी जोडी चांगली सेट झाली आहे असे वाटत असताना लुंगी एन्गिडीने भारताला पहिला धक्‍का दिला. त्याने मयंक अग्रवालला पायचित केले. मयंकने 9 चौकारांच्या मदतीने 123 चेंडूंत 60 धावा केल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर भारताला दुसरा मोठा धक्‍का बसला. चेतेश्‍वर पुजारा पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला लुंगी एन्गिडीच्या चेंडूवर टेंबा बावुमाने झेलबाद केले. भारताची धावसंख्या यावेळी 2 बाद 117 अशी होती.

दोन धक्केबसल्यानंतर सलामीवीर के. एल. राहुल याने कसोटी कारकिर्दीतील 13 वे अर्धशतक झळकावले. त्याने 127 चेंडूंत 51 धावांच्या खेळीत नऊ चौकार मारले. पुजारा बाद झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानावर आला. त्यानेही राहुलला साथ देण्याचे धोरण स्वीकारले.

दोन धक्क्यांनंतर राहुलने विराटसह भारताचा डाव सांभाळला आणि चहापानाच्या वेळेपर्यंत विकेट गमावली नाही. चहापानाच्या वेळेपर्यंत भारताने 2 गडी गमावून 157 धावा केल्या होत्या. विराट कोहली 19 आणि राहुल 68 धावांवर खेळत होते.

भारताची धावसंख्या 199 असताना भारताला तिसरा धक्‍का बसला. कर्णधार विराट कोहली 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला पहिल्या स्लिपमध्ये मुल्डरने लुंगी एन्गिडीने झेलबाद केले. तो मोठी धावसंख्या करेल अशी शक्यता होती; पण तो स्वस्तात बाद झाला. विराट आणि राहुलमध्ये तिसर्‍या विकेटस्साठी 82 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर दुसर्‍या बाजूने राहुलने शतकाला गवसणी घातली. 41 व्या कसोटी सामन्यांतील राहुलचे हे 7 वे कसोटी शतक आहे. राहुलच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेर 3 बाद 272 धावा केल्या आहेत. राहुल 122 धावांवर नाबाद खेळत होता. राहुलने 17 चौकार तर एक षटकार मारला. दुसर्‍या बाजूला अजिंक्य रहाणे 81 चेंडूंत 40 धावांवर खेळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT