पुढारी ऑनलाईन : गुन्हेगारी विश्वात बिकिनी किलर या नावाने कुख्यात असलेला फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. वयाच्या आधारावर त्याला सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन अमेरिकी पर्यटकांच्या हत्येच्या आरोपाखाली चार्ल्सला २००३ मध्ये नेपाळमध्ये अटक केली होती.
त्याच्या आयुष्यावर बेतलेला 'मैं और चार्ल्स' हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता रणदीप हुड्डा याने चार्ल्सची भूमिका साकारली होती. चित्रपटातील रणदीपच्या कामाची खूप प्रशंसा झाली होती. रणदीपने साकारलेला चार्ल्स हा इतका हुबेहूब होता की, कुणीही त्यात गोंधळून जाईल, अशीच एक घटना नुकतीच घडली आहे.
शोभराजच्या सुटकेची बातमी एका नामवंत वृत्तपत्रात छापताना त्या बातमीबरोबर जो फोटो जोडला आहे तो मात्र, रणदीपने साकारलेल्या चित्रपटातील भूमिकेचा असल्याने यावर चांगलीच चर्चा होत आहे. वृत्तपत्रात या बातमीबरोबर रणदीपचा फोटो छापल्याने चांगलीच तारांबळ उडाली आहे.