पुढारी ऑनलाईन : जेनेलिया डिसुझाने १० वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केले आहे. 'वेड' या मराठी चित्रपटात तिने पती रितेश देशमुखसोबत मुख्य भूमिका साकारली आहे. आता नुकतेच एका मुलाखतीत तिने या कमबॅकवर भाष्य केले आहे.
ती म्हणाली, 'वेड' चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद प्रेरणादायी आणि अद्भुत आहे. माझ्यासाठी हा अनुभव खूपच खास होता, कारण ज्यावेळी तुम्ही १० वर्षांनंतर परत येता, त्यावेळी तुमच्या मनात विविध प्रश्न घोंघावत असतात. मी खरेच स्क्रीनवर उत्तम काम करू शकेन का? मला जी कामगिरी करायची आहे, त्यात मी सर्वोत्तम योगदान देऊ शकेन का, असे प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले होते.