तासगाव ः प्रमोद चव्हाण : पेड (ता. तासगाव) या छोट्याशा गावातील शेखर रणखांबे या तरुणाने महिलांच्या सामाजिक समस्यांवर बनवलेल्या 'रेखा' या लघुपटाची गोवा येथे दि. 20 ते 28 नोव्हेंबररोजी होणार्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी (इफ्फी) निवड झाली आहे. जगभरामधील चित्रपटसृष्टीत गौरवाचा असा हा सन्मान मिळाला आहे. इफ्फीसाठी भारतातून 20 तर, महाराष्ट्रातून केवळ 'रेखा' या एकमेव लघुपटाची निवड झाल्याने देशभरातून शेखर रणखांबे व चित्रपटातील मुख्य कलाकार रेखा उर्फ माया पवार हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शेखरने यापूर्वी 'धोंडा' व 'पांप्लेट' असे दोन सामाजिक विषयावर लघुपट बनवले आहेत. समाजातील मुलभूत, दुर्लक्षित प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचे काम शेखर या लघुपटांच्या माध्यमातून करतो. यातील 'पांप्लेट' हा लघुपट मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित असे नटरंग, रेगे, टाईमपास, बालक पालक अशा दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी पाहिला होता. त्यानंतर शेखरला त्यांनी मदतीचे आश्वासन दिले होते.
'रेखा' हा लघुपट बनविताना शेखर याने सर्वच स्तरातील महिलांना येणार्या सामाजिक अडचणी, शारीरिक अडचणींवर प्रकाशझोत टाकला आहे. विशेष म्हणजे या लघुपटात मुख्य नायिकेचे पात्र साकारलेली रेखा उर्फ माया पवार ही एका पारधी कुटुंबातील आहे. तासगाव तालुक्यातील तिचे गाव आहे. यामध्ये केलेल्या तिच्या कलाकृतीला तसेच चित्रपट कथेला सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासनाच्या स्वराज्य महोत्सवामध्ये उत्कृष्ट लघुपट, उत्कृष्ट दिग्दर्शन तसेच उत्कृष्ट कलाकार म्हणून सन्मान मिळाला आहे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या या कार्यक्रमामुळे या लघुपटाची चित्रपटसृष्टीत चर्चा सुरू झाली.
या लघुपटाचे शूटिंग सांगली बसस्थानक, हरिपूर परिसर या भागात करण्यात आले आहे. माया पवार हिच्यासोबत तिच्या बहिणीने देखील या चित्रपटामध्ये भूमिका साकारली आहे. 'रेखा' लघुपट तयार करताना भागातीलच कॅमेरामॅन प्रताप जोशी, संकलन वैभव जाधव, ध्वनी संयोजन मंदार कमलापूरकर, सचिदानंद निकम, प्रॉडक्शन हेड कुलदीप देवकुळे यांच्यासोबत जिल्ह्यातील अनेकांनी कामे पार पाडली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्यातील तरुणाचा लघुपट नांमाकन होतोय, ही सांगलीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे
या लघुपटाला आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालेल्या नामांकनाबद्दल बोलताना दिग्दर्शक शेखर रणखांबे म्हणाले, आपण माणूस आहोत. मात्र याचा विसर आपल्याला पडत चाललाय. त्यामुळे या गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठीचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. सामाजिक जाणीवा जाग्या करणे, लोकांसमोर आणणे, हेच कार्य पुढेही सुरू राहील.