नवी दिल्ली : हवाला प्रकरणात अडकलेली चित्रपट अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी 14 सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. याबाबत पोलिसांनी जॅकलीनला समन्स जारी केले आहे. याआधी जॅकलीनला 12 तारखेला हजर राहण्यास सांगण्यात आले होते, मात्र काही कारणांमुळे दिल्लीत येऊ शकत नसल्याचे तिने पोलिसांना कळविले होते. घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याच्या हवाला प्रकरणात जॅकलीनची ईडी तसेच दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केलेली आहे. सुकेशने एका उद्योगपतीकडून दोनशे कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. हवाला प्रकरणात ईडीने अलीकडेच जॅकलीनच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.