zubeen garg dies scuba diving accident Singapore
मुंबई - संगीतविश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांचे १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान अपघाती निधन झाले. वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. या घटनेमुळे संपूर्ण संगीतविश्वात शोककळा पसरली.
जुबीन गर्ग यांनी बॉलिवूडमध्ये गाजलेलं ‘गँगस्टर’ या इमरान हाशमी आणि कंगना रनौत स्टारर चित्रपटातील ‘या अली’ हे गाणं गाऊन लोकप्रियता मिळवली होती. या गाण्याने त्यांना केवळ हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं नाही, तर त्यांचं नाव देशोदेशी गाजलं. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी, आसामी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली होती.
आसामी गायक २० आणि २१ सप्टेंबर रोजी नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलसाठी सिंगापूरमध्ये होते, जिथे त्यांचे सादरीकरण होणार होते.
त्यांना समुद्रातून वाचवण्यात आले आणि सीपीआर देण्यात आला, परंतु सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला, जिथे त्यांना नेण्यात आले. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सिंगापूरमधील नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलच्या प्रतिनिधीने एका वेबसाईटला सांगितले की, स्कूबा डायव्हिंग करताना गर्ग यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.
"आम्हाला झुबीन गर्गच्या निधनाची बातमी सांगताना खूप दुःख होत आहे. स्कूबा डायव्हिंग करताना त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांना ताबडतोब सीपीआर देण्यात आला. दुपारी २.३० च्या सुमारास आयसीयुमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले."
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी झुबीन गर्ग यांच्याबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी एक्स अकाऊंटवर श्रद्धांजली वाहिती आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय-ते "खूप लवकर गेले आहेत, हे जाण्याचे वय नाही".
आसामचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री अशोक सिंघल यांनी एक्स अकाऊंटवर जुबीन यांना श्रद्धांजली वाहिली.
ते ट्विटमध्ये म्हणाले, "आमच्या प्रिय झुबीन गर्गच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले आहे. आसामने केवळ एक आवाजच नाही तर एक हृदयाचा ठोका गमावला आहे."