पुढारी ऑनलाईन डेस्क - बाईपण भारी देवा चित्रपटाच्या भरघोस यशानंतर जिओ स्टुडिओज् आणि केदार शिंदे ही सुपरहीट जोडी २५ एप्रिल २०२५ रोजी ‘झापुक झुपूक’ हा कौटुंबिक मनोरंजन करणारा सिनेमा घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यास येत आहेत. नुकतेच या सिनेमाचा धमाल ट्रेलर रितेश देशमुखने रिलीज केला आहे. रिलीझ होताच हा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे अभिनेता रितेश देशमुखचा सूरज चव्हाण खूप मोठा चाहता आहे आणि आज बिग बॉस सीजन ५ च्या यशानंतर रितेश सूरजच्या या खास क्षणी सामील झाला आहे. दिग्दर्शक केदार शिंदे ह्यांनी बिग बॉस च्या वेळीच सूरज सोबत एक चित्रपट बनवण्याचं ठरवलं होतं आणि आता ते अमलात आणून २५ एप्रिल रोजी फिल्म रिलीज ही होतेय.
सूरज चव्हाण अभिनित ‘झापुक झुपूक’ या सिनेमाचं ट्रेलर आनंदाची मेजवानी घेऊन आलाय. रोमान्स, ॲक्शन, ड्रामा या सर्व गोष्टींवर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आहे. हा ट्रेलर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये या सिनेमाची क्रेज जास्त पहायला मिळते. सूरज चव्हाणची स्टाईल आणि धमकेदार डायलॉग्स अख्ख्या महाराष्ट्रात आता गाजणार आहे. ट्रेलर मध्ये दोन कमाल गाण्यांची झलक सुद्धा पहायला मिळते. त्यातील एक गाणं नक्कीच ह्या पुढे हळद गाजवणार. त्याचसोबत सुरज आणि जुई भागवतची छान जोडी अजून आकर्षक करते.
ट्रेलर लाँचच्यावेळी अभिनेता रितेश देशमुखने ‘झापुक झुपूक’ च्या प्रवासाबद्दल सांगितलं. तो म्हणाला, "बिग बॉसची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझा आणि सूरज साठी तो पहिला प्रवास होता. केदार भाऊंसाठी सुद्धा तो पहिला प्रवास होता. सूरज जेव्हा बॉग बॉसच्या घरात तिसऱ्या आठवड्यात होता तेव्हाच केदार भाऊंनी सूरजवर सिनेमा बनवण्याचं ठरवलं होतं. त्यांनी त्यावेळी मला म्हंटलं होतं की, विजेता कोण पण असू दे मी सूरजवर चित्रपट बनवणार आणि ह्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. असं नाही आहे की, सूरज जिंकल्यावर सिनेमा बनवण्यात आलाय. त्यामुळे केदार भाऊंच्या हिंमत आणि कमिटमेंटला माझा सलाम आहे. या सिनेमाचं संगीत, एडिटिंग, स्टोरी सगळंच अप्रतिम आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर आहे. सूरज आणि संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. महाराष्ट्रतील प्रेक्षक आणि सूरजचे चाहते नक्कीच सिनेमागृहात जाणार आहे यात मला काहीच शंका नाही. मला सूरजचा खूप अभिमान आहे.
यावेळी दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले 'झापुक झुपूक'ची कल्पना जेव्हा मला आली सूरज चव्हाण ला घेऊन त्यावेळेस बिग बॉस मराठी सुरु होतं. त्यावेळी माझं आणि रितेशचं खूप बोलणं सुरु असायचं तेव्हाच मी ती कल्पना रितेशला सांगितली. रितेशला ही कल्पना खूप आवडली आणि त्यांनी सुद्धा मला सांगितलं की, जर माझ्याकडे उत्तम गोष्ट आहे तर मी ती पुढे आणावी. आज या ट्रेलरच्या माध्यमातून मी एक सुंदर गोष्ट प्रेक्षकांसमोर आणतोय आणि ह्या वेळेस सुद्धा रितेश भाऊ माझ्या सोबत उभा आहे ह्याचा मला आनंद आहे."
‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज सोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ही गोष्ट आहे. एका लव्हस्टोरी सोबतच वेग वेगळ्या भावनांचा मिश्रण या सिनेमात पहायला मिळणार आहे.
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" सिनेमाचा मजेशीर ट्रेलर नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे आणि आता प्रेक्षक सिनेमाच्या रिलीझ ची आतुरतेने वाट पाहत आहे. "झापुक झुपूक" हा सिनेमा चित्रपटगृहात, २५ एप्रिल पासून प्रदर्शित होणार आहे.