पुढारी ऑनलाईन डेस्क : "तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलत असाल तर सावध राहा. तुम्ही मूळचे आंध्र प्रदेश राज्यातील आहात. इथे राहायला आला आहात. तेलंगणा राज्यासाठी तुमचे काय योगदान आहे?, असा सवाल करत नुकतेच उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी तुमच्या घरी काहीतरी केले आहे. यापुढे तुम्ही तुमचा मार्ग सुधारला नाहीत तर तेलंगणामध्ये तुमचे चित्रपट चालू देणार नाही," असा इशारा सत्ताधारी काँग्रेसचे आमदार आर भूपती रेड्डी यांनी दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता अल्लू अर्जूनला दिला आहे.बहुचर्चित 'पुष्पा-२' चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जून आणि तेलंगणामधील सत्ताधारी काँग्रेस सरकार यांच्यातील संघर्ष अधिक चिघळल्याचे स्पष्ट झाले आहे. ( Allu Arjun Pushpa 2 stampede Case)
काँग्रेस पक्ष कधीच चित्रपट उद्योगाच्या विरोधात कधीच नव्हती. यापुढे असणार नाही. काँग्रेस सरकारने उद्योग रुजवण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना हैदराबादमध्ये जमीन दिली होती, असेही निजामाबाद (ग्रामीण) येथील आमदार आर भूपती रेड्डी यांनी स्पष्ट केले. ४ डिसेंबर रोजी पुष्पा चित्रपटाच्या प्रदर्शनाला संध्या चित्रपटगृहात अल्लू अर्जून परवानगीशिवाय गेला होता, असा दावा करत पुष्पा हा चित्रपट समाजासाठी विधायक संदेश देणारा नाही हा चित्रपट एका तस्कराची कथा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ( Allu Arjun Pushpa 2 stampede Case)
४ डिसेंबर रोजी पुष्पा-2 चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अल्लू अर्जून याने केलेला रोड शो आणि चित्रपटगृहात उसळलेल्या गर्दीवरुन टीका केली होती. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेल्या आरोप फेटाळले होते. हा एक निव्वळ अपघात होता, असा अल्लू अर्जुनने म्हटले होते.
चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद शहर पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध बीएनएसच्या विविध कलमांखाली चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी महिलेच्या मृत्यूप्रकरणी अटक केली होती. त्याच दिवशी तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मंगळवारी ( २४ डिसेंबर) हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जून याची सलग चार तास चौकशी केली होती.