आयपीएलमधील 'सनरायझर्स हैदराबाद' संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योजिका काव्या मारन आणि सुप्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले आहेत.
अनिरुद्ध रविचंदरचा जन्म १६ ऑक्टोबर १९९० रोजी चेन्नई, तमिळनाडू येथे झाला. त्याचे वय ३५ वर्षे आहे. अनिरुद्ध हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक चित्रपट संगीतकार, पार्श्वगायक आणि संगीत निर्माता आहे. प्रामुख्याने तमिळ चित्रपटसृष्टीत आपल्या संगीताची जादू पसरवणाऱ्या अनिरुद्ध याने तेलुगू आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
धनुष आणि श्रुती हासन यांची मुख्य भूमिका असलेल्या '३' या चित्रपटातील 'व्हाय धिस कोलावेरी डी' या गाण्याने अनिरुद्धला रातोरात देशभरातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. 'कत्थी', 'थेरी', 'पेट्टा', 'मास्टर', 'विक्रम', 'जेलर', 'लिओ', 'इंडियन २' यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर तमिळ चित्रपटांना त्याने संगीत दिले.
शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तर ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटालाही संगीतबद्ध केले. 'वाथी कमिंग', 'अरेबिक कुथू', 'कावाला' आणि 'ब्लडी स्वीट' ही त्यांची गाणी प्रचंड गाजली. २०२४-२५ मध्ये त्यांनी लंडन, झुरिच, मेलबर्न आणि सिडनी यांसारख्या जागतिक शहरांमध्ये 'हुकूम वर्ल्ड टूर'च्या माध्यमातून लाइव्ह कॉन्सर्ट्स गाजवले.
आपल्या कारकिर्दीत अनिरुद्धनी रजनीकांत, कमल हासन, विजय, अजित कुमार, शाहरुख खान आणि ज्युनियर एनटीआर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना आतापर्यंत दोन फिल्मफेअर (साऊथ), दहा 'सीमा', सहा एडिसन आणि पाच विजय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०२६ मध्ये त्यांनी 'अल्बुकर्क रेकॉर्ड्स' नावाचा स्वतःचा म्युझिक लेबलदेखील सुरू केला आहे. अनिरुद्धने आपली एकूण संपत्ती आणि गुंतवणुकीबाबतची माहिती नेहमीच गुप्त ठेवली आहे.
अनिरुद्धचा जन्म एका प्रतिष्ठित आणि कलासक्त कुटुंबात झाला आहे. त्यांचे वडील रवी राघवेंद्र हे अभिनेते आहेत, तर आई लक्ष्मी रविचंदर या शास्त्रीय नृत्यांगना आहेत. विशेष म्हणजे, सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी त्याचे जवळचे नाते आहे. रजनीकांत यांच्या पत्नी लता या अनिरुद्धच्या आत्या आहेत, त्यामुळे ऐश्वर्या आणि सौंदर्या या त्याच्या चुलत बहिणी लागतात. तसेच, प्रसिद्ध चित्रपट निर्माते के. सुब्रमण्यम हे त्याचे पणजोबा, तर विख्यात शास्त्रीय नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम या त्याच्या आजी लागतात.