मनोरंजन

बप्पी लहरी यांना झालेला ‘ओएसए’ म्हणजे कोणता आजार?

स्वालिया न. शिकलगार

मुंबई :

गायक-संगीतकार बप्पी लहरी यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे मुख्य कारण ठरले ते म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया म्हणजेच 'ओएसए' ही व्याधी. गेल्या वर्षीपासून त्यांना या व्याधीने गाठले होते. ही व्याधी कशी आहे व तिचा शरीरावर कोणता परिणाम होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

झोपेशी संबंधित श्‍वासोच्छ्वासाच्या विकाराला 'स्लीप अ‍ॅप्निया' असे म्हणतात. त्याच्या तीन प्रकारांपैकी एक हा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया आहे. सेंट्रल स्लीप अ‍ॅप्निया आणि कॉम्प्लेक्स स्लीप अ‍ॅप्निया असे त्याचे अन्य दोन प्रकार आहेत. 'ओएसए'मध्ये व्यक्‍तीच्या घशाचे स्नायू शिथिल होतात आणि श्‍वासनलिकेत अडथळा निर्माण करतात. त्यामुळे त्या व्यक्‍तीचा श्‍वासोच्छ्वास बंद होतो.

या विकाराच्या सर्वात महत्त्वाच्या लक्षणांपैकी एक ठळक लक्षण म्हणजे अतिशय मोठ्या आवाजात घोरणे. याशिवाय सतत दिवसा झोप लागणे, रात्री झोपेतून अचानक जाग येणे आणि त्यानंतर पुन्हा झोप लागताना श्‍वास लागणं किंवा श्‍वासोच्छ्वासात अडथळा येणे ही महत्त्वाची लक्षणे आहेत.

सकाळी डोकेदुखी, तोंडाला कोरड पडणे, उच्च रक्‍तदाब, सतत मूड बदलणे आणि एकाग्रतेचा अभाव हीदेखील याची काही ठळक लक्षणे आहेत. एखाद्या व्यक्‍तीचे शरीर झोपेच्या 'आरईएम' म्हणजे गाढ झोपेच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे हा विकार उद्भवतो.

SCROLL FOR NEXT