The Delhi Files is now The Bengal Files
मुंबई - विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या बहुचर्चित "फाईल्स" त्रयीतील तिसऱ्या चित्रपटाचं नाव आता पब्लिक डिमांडवरून बदलण्यात आलं आहे. पूर्वी या चित्रपटाचं नाव ‘द दिल्ली फाईल्स: द बंगाल चॅप्टर’ होतं. मात्र आता हे नाव बदलून ‘द बंगाल फाईल्स : राईट टू लाईफ’ करण्यात आलं आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांनी प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ‘द ताश्कंद फाईल्स’ (२०१९) आणि ‘द काश्मीर फाईल्स’ (२०२२) नंतर आता ‘द बंगाल फाईल्स : राईट टू लाईफ’ ही चित्रपट मालिकेतील तिसरी आणि महत्त्वाची कडी ठरणार आहे. हा चित्रपट विशेषतः १९४० च्या दशकात भारताच्या फाळणीपूर्व काळात बंगालमध्ये घडलेल्या भीषण सांप्रदायिक दंगलींवर आधारित आहे.
या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार हे नावाजलेले कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. टीझरमध्ये मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला लूक अत्यंत प्रभावी होता – एका निर्जन कॉरिडॉरमध्ये ते थकलेले, पांढऱ्या दाढीत, जळालेल्या जिभेने संविधानाची प्रस्तावना वाचताना दिसतात.
या चित्रपटाचं चित्रीकरण सुरक्षेच्या कारणास्तव कोलकाताच्या ऐवजी मुंबईत करण्यात आलं. ‘द बंगाल फाईल्स: राईट टू लाईफ’ चित्रपट विवेक रंजन अग्निहोत्री यांनी लिहिला आहे आणि याचे निर्माता आहेत – अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी आहेत. चित्रपटाचं सादरीकरण तेज नारायण अग्रवाल आणि आय एम बुद्धा प्रोडक्शनने केलं आहे. हा चित्रपट केवळ इतिहासाचं दर्शन घडवणारा नसून, तो भारतीय जनतेला त्यांच्या हक्कांविषयी आणि अस्तित्वाच्या लढ्यांविषयी विचार करायला भाग पाडणारा ठरणार आहे.