पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे मंगळवारी (दि.८) निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Salim Akhtar passes away)
१९८० आणि १९९० च्या दशकात त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपटाची निर्मिती केली. यादरम्यान त्यांनी १९९७ मध्ये 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटातून राणी मुखर्जीला चित्रपटात ब्रेक दिला होता. याबरोबरच ‘चोर की बारात’, ‘कयामत’, ‘लोहा’, ‘बटवारा’, ‘फूल और अंगारे’, ‘बाजी’, ‘इज्जत’ आणि ‘बादल’ अशा लोकप्रिय चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. अभिनेत्री तमन्ना भाटियाला त्यांनी ‘चांद सा रोशन चेहरा’ मध्ये लाँच केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि.९) दुपारी १.३० वाजता इर्ला मशिदीजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Salim Akhtar passes away)