मनोरंजन

Actor Mushtaq Khan death : ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

२० नोव्हेंबर २०२४ रोजी मेरठमधील अपहरणाच्या घटनेने उडाली होती खळबळ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत असून बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि चतुरस्त्र अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन झाले आहे. ते 56 वर्षांचे होते. 'वेलकम', 'गदर', 'आशिकी', 'मुझसे शादी करोगी' आणि 'हम हैं राही प्यार के' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मुश्ताक खान यांनी जगाचा निरोप घेतला.

मुश्ताक खान यांच्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांना पाच वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते; मात्र नुकताच या आजाराने पुन्हा डोके वर काढले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती वेगाने खालावत गेली. अखेर आज त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

मुश्ताक खान यांचे व्यावसायिक भागीदार शिवम यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.

चित्रपटांमध्ये सहाय्यक आणि विनोदी भूमिका साकारून मुश्ताक खान यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 'वेलकम' चित्रपटातील त्यांची विशेष शैली प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. त्याव्यतिरिक्त 'आशिकी', 'मुझसे शादी करोगी' आणि 'हम हैं राही प्यार के' या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनीही प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले. रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुश्ताक खान यांच्या पार्थिवावर उद्या, २५ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, मुश्ताक खान हे २०२४ मध्ये एका अत्यंत भयंकर अपहरणाच्या घटनेला सामोरे गेले होते. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मेरठमधील एका कार्यक्रमाचे निमित्त साधून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळावरून त्यांना एका कारमध्ये बसवून बिजनौर येथे नेण्यात आले आणि तिथे त्यांना ओलीस ठेवण्यात आले होते. या गुंडांनी सुमारे १२ तास त्यांचा छळ केला होता आणि सुटकेसाठी तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

चित्रपटसृष्टीत काम करणारा प्रत्येक अभिनेता कोट्यवधी रुपयांची कमाई करतो, असा अपहरणकर्त्यांचा गैरसमज होता; मात्र मुश्ताक खान यांच्याकडे इतके पैसे नाहीत हे समजल्यावर तेही थक्क झाले होते, अशी आपबिती स्वतः मुश्ताक खान यांनी सुटकेनंतर कथन केली होती. एका नाट्यमय घडामोडीनंतर ते या संकटातून सुखरूप बाहेर पडले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT