पुढारी ऑनलाईन डेस्क : लैंगिक शोषण आरोपांमुळे सध्या मल्याळम फिल्म इंडस्ट्री (मॉलिवूड) हादरली आहे. दरम्यान दररोज कुठल्या ना कुठल्या दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यावर लैंगिक शोषणाचे आरोप होत आहेत. यामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे. न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल आल्यानंतर अनेक दिग्गज अभिनेत्रींनीही याबाबत आवाज उठवला आहे. तर ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मोहनलाल ( Mohanlal) यांनी असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट (AMMA) संघटनेच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणीचे स्वागत करत असल्याचे म्हटलं होतं. यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते मामूट्टी ( Mammootty ) यांनीही याप्रकरणी मौन सोडले आहे.
हेमा समितीच्या अहवालाबाबत ज्येष्ठ अभिनेते ममूट्टी यांनी त्याच्या फेसबुक अकाउंटवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'ही पोस्ट करण्या मागचा हेतू हा मल्याळम सिनेजगतासमोर येणाऱ्या घटना आणि घडामोडी आहेत. संघटनेची पद्धत अशी आहे की, कलाकारांची संघटना आणि नेतृत्व त्यावर आधी प्रतिक्रिया देतात. इतकी वेळ वाट पाहिली कारण, अशा ऑडिओ प्रतिक्रियांनंतर आपण सदस्य म्हणून टिप्पणी केली पाहिजे असे आम्हाला वाटते.'
त्यांनी पुढे लिहिले आहे की, 'सिनेमा हा समाजाचा परिघ आहे. समाजातील सर्व चांगले गुण असतात आणि ते गुण चित्रपटांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. याकडे चित्रपटसृष्टीतील अनेक मंडळी बारीक लक्ष ठेवून असतात. त्यामुळे तिथे घडणाऱ्या छोट्या-मोठ्या सर्व गोष्टींवर मोठी चर्चा होत असते. या परिस्थितीत काहीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, चित्रपट निर्मात्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. चित्रपटसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी, अहवाल तयार करण्यासाठी, उपाय सुचवण्यासाठी आणि कधीही न घडलेल्या घटनेनंतर कारवाईची शिफारस करण्यासाठी सरकारने न्यायमूर्ती हेमा समितीची स्थापना केली होती. त्या अहवालात नमूद केलेल्या सूचना आणि उपायांचे सर्वत्र स्वागत आणि समर्थन करत आहे.’
मामूट्टी यांनी लिहिले की, 'चित्रपट उद्योगातील सर्व संघटनांनी त्यांच्या अंमलबजावणीसाठी वेगळे न होता एकत्रित उभे राहण्याची वेळ आली आहे. समोर आलेल्या तक्रारींचा पोलिस तपास जोमाने सुरू आहे. न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल न्यायालयासमोर आहे. पोलिसांना प्रामाणिकपणे तपास करू द्या. कोर्टाला शिक्षा ठरवू द्या. चित्रपटात 'पॉवर सेंटर' नाही. 'रामगवुमल्ला' या चित्रपटात अशी गोष्ट कशी असू शकते?' असेही ते म्हणाले.
यासोबत न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालातील व्यावहारिक शिफारशींची अंमलबजावणी करावी आणि कायदेशीर अडथळे असतील तर आवश्यक ते कायदे करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. याआधी ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मोहनलाल यांनी त्याचे मत व्यक्त केलं होतं.
मोहनलाल म्हणाले की, हेमा समितीच्या अहवालाचे आम्ही स्वागत करतो. तो अहवाल जाहीर करणे हा सरकारचा योग्य निर्णय होता. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही सर्व लक्ष मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनवर केंद्रित करू नका. सध्या तपास सुरू आहे. कृपया मल्याळम फिल्म इंडस्ट्री नष्ट करू नका. हे प्रश्न प्रत्येकाला विचारता येत नाहीत. हा अतिशय मेहनतीचा उद्योग आहे. यासाठी प्रत्येकाला दोषी धरता येणार नाही, जे जबाबदार असतील त्यांना शिक्षा होईल.