Vashu Bhagnani hospitalized London : बॉलीवूड चित्रपट निर्माते वाशू भगनानी यांना लंडनमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे वृत्त ANI ने दिले आहे. विशेष म्हणजे वाशू भगनानी आणि त्यांची सून, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांच्याशी संबंधित १२ मालमत्तांवर आर्थिक विभागाने धाडी टाकल्याचे वृत्त आल्यानंतर काही दिवसांतच त्यांना प्रकृतीच्या समस्येचे वृत्त समोर आले आहे.
चित्रपट निर्मितीच्या नावाखाली परदेशात वळवल्या जाणाऱ्या कथित आर्थिक अनियमित व्यवहारप्रकरणी वाशू भगनानी आणि त्यांची सून, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांच्याशी संबंधित १२ मालमत्तांवर आयकर विभागाने धाड टाकली. आयकर विभागाची अनेक पथके कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि कथित परदेशी व्यवहारांची तपासणी करत होती. तसेच कुमार मंगत यांच्या नेतृत्वाखालील 'पॅनोरामा स्टुडिओज'शी संबंधित ठिकाणांचीही झडती घेतली. दरम्यान, या कारवाईबाबत वाशू भगनानी किंवा रकुल प्रीत सिंग यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
वाशू भगनानी हे बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध निर्माते आहेत. त्यांनी १९९५ मध्ये 'पूजा एंटरटेनमेंट' स्थापन केली. याच वर्षी त्यांनी अभिनेता गोविंदाच्या 'कुली नंबर १' चित्रपटाची निर्मिती केली. यानंतर त्यांनी 'हिरो नंबर १', 'बीवी नंबर १', 'प्यार किया तो डरना क्या' आणि 'रहना है तेरे दिल में' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. मात्र यानंतर त्यांचे 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'बेल बॉटम' यांसारखे मोठे बजेट असलेले चित्रपट अपयशी ठरले.
वाशू यांचा मुलगा जॅकी भगनानी याने २००९ मध्ये 'कल किसने देखा' या चित्रपटातून अभिनेता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र अनेक चित्रपट अयशस्वी ठरल्यानंतर त्यानेही चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकले. त्याने २०२४ मध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिच्याशी विवाह केला. कार्यालयाच्या जागेची विक्री केल्यानंतर 'पूजा एंटरटेनमेंट' मागील वर्षी पुन्हा एकदा चर्चेत आली होती. त्यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांचे अनेक महिन्यांचे पगार व इतर देणी दिली गेली नसल्याचा आरोप केला होता.