मनोरंजन

#BodyPositivity जाडजूड महिलांनी ग्लॅमरस फोटोशूट करू नये का?

Pudhari News

स्वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन डेस्क 

वनिता खरात ही मराठमोळी अभिनेत्री. एका फोटोमुळे प्रसिध्दीच्या झोतात आली. शाहिद कपूर स्टारर हिंदी चित्रपट कबीर सिंहमध्ये वनिताने घरकाम करणाऱ्या मोलकरीणची भूमिका साकारली होती. 'कबीर सिंग' या चित्रपटात शाहिद कपूर मोलकरणीच्या मागे पळत असल्याचं दृश्य आहे. तो जिच्या मागे धावताना दिसला होता, ती अभिनेत्री वनिता खरात. त्यावेळी तिची इतकी चर्चा झाली नाही. मात्र, तिने इंडस्ट्रीचं लक्ष वेधून घेतलं. आता ती सर्वांच्या नजरेत आली आहे. कारण आहे-वनिताचे न्यूड फोटोशूट. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर ट्रोलर्सनी तिच्यावर निशाणा साधण्यास सुरू केले आहे. आता प्रश्न उरतो तो की, जाडजूड व्यक्तींनी फोटोशूट करू नये का? स्लिम ट्रीम अभिनेत्रींनी फोटोशूट, शॉर्ट ड्रेस फोटोशूट, बिकिनी फोटोशूट केलेलं चालतं. मग, जाड व्यक्तींच फोटोशूट स्वीकारलं का जात नाही? 

वनिताने न्यूड फोटोशूट केले आहे. तिचा न्यूड फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या फोटोशूटची एकच चर्चा सुरू झाली. वनिताने स्वत: हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत १४ हजार ४८२ लोकांनी पाहिला आहे. तर १ हजार १०० जणांनी कमेंट्स दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तिचं भरभरून कौतुक केलंय. तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे. तिने रावण फ्युचर प्रॉडक्शन्ससाठी हे फोटोशूट केलं आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे, ॲडगुरू-अभिनेता भरत दाभोळकर आणि फोटोग्राफर तेजस नेरूरकर यांची ही संकल्पना आहे. 

वनिता सोनी मराठीवरील कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रामधून लोकप्रिय झाली होती. ती या शोची विजेतीही ठरली होती.

काय आहे वनिताच्या फोटोमध्ये? 

वनिताने एका हातात निळ्या पतंगाचा आडोसा घेत न्यूड फोटोसाठी पोझ दिली आहे. तिने हा फोटोशूट एका कॅलेंडरसाठी केले असून फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी हा फोटो काढला आहे. शिवाय #BodyPositivity असा हॅशटॅग वापरत हा फोटो शेअर करण्यात आला आहे. 

वनिताने आपल्या फोटोबरोबर एक पोस्टही लिहिली आहे की, 'मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास आणि मला माझ्या शरीराचा अभिमान आहे. कारण, मी मी आहे.' (I am proud of my talent, my passion, my confidence, I am proud of my body… because I am ME…!!!") त्याचबरोबर, बॉडी पॉझिटिव्हीटी चळवळीत सहभागी व्हा. अशीही कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. (Let's get together to join this Body Positivity Movement) तिचा न्यूड फोटो आणि दिसून येणारा स्थूलपणा अनेकांच्या पचनी पडलेला नाही. ट्रोल करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. पण, तिचे कौतुक मात्र सोशल मीडियावर होताना दिसतेय. 

झगमगत्या विश्वात काय घडत नाही? जे काही घडेल, ते नवेच असते आणि ते आपण अगदी सहज स्वीकारतोही. सेलिब्रिटी कसले कसले फोटोशूट करतात! स्वीमिंग पूल फोटोशूट, ब्रायडल फोटोशूट, हनीमून फोटोशूट, प्री-वेडिंग फोटोशूट, बेबी शॉवर फोटोशूट आणि बरचं काही…! तर मग, वनिताने फोटोशूट केलं म्हणून कुठं बिघडलं? ती एक कॉमेडी स्टारदेखील आहे. उत्तम अभिनयाचे कौशल्यदेखील तिच्याकडे आहे. एक मराठमोळी अभिनेत्री विनोदाच्या मंचावरून अख्ख्या महाराष्ट्रात ओळखली गेली. आता तर ती एका फोटोमुळे मिनिटात स्टार झाली आहे. 

बोल्ड काया असणं गुन्हा आहे का? 

तिची बोल्ड काया असणे हा काय तिचा गुन्हा नव्हे. बोल्ड काया असणाऱ्या अनेक मराठी आणि हिंदी अभिनेत्रींना आपण स्वीकारलंय. यामध्ये अभिनेत्री अलका कुबल, निर्मिती सावंत, किशोरी अंबिये, आरती साळुंखे रात्रीस खेळ चाले फेम शेवंता अर्थातच अपूर्वा नेमळेकर, पछाडलेला फेम पूर्णिमा अहिरे, देवमाणूस फेम मंजुळा अर्थातच प्रतीक्षा जाधव आणि आता अण्विता फलटणकर (आगामी मालिका येऊ कशी तशी मी नांदायला) या सेलेब्सचा समावेश आहे. तर हिंदी चित्रपटांमध्ये आयेशा टाकिया, सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, शिल्पा शिरोडकर, साथ निभाना साथिया फेम कोकिलाबेन अर्थातच रूपल पटेल अशा काही सुंदर अभिनेत्री अतिशय उत्तमपणे अभिनय साकारतात. मग, तिथे त्यांचं वजन पाहिलं जात नाही. कारण, प्रेक्षकांनीचं त्यांना स्वीकारलेलं असतं. मग, वनिताने वेगळं काय केलं? किती जाड आहे, किती ढोबळी आहे, असे कमेंट या दिग्गज अभिनेत्रींना सहसा मिळालेले दिसले नाहीत. दिसलं ते त्यांच्या अभिनयातलं कौशल्य.  

सौंदर्याची व्याख्या कशी करणार? 

पूर्वी, अभिनेत्री म्हणजे सुडौल बांधा किंवा झिरो फिगर उंचपुऱ्या तरूणी, दिसायला देखण्या असं समीकरणचं होतं. कालांतराने हे चित्र बदललं. अंगाने जाडजूड असणाऱ्या, फारशा सुंदर नसणाऱ्या पण, नाका-डोळ्याने देखण्या असणाऱ्या अभिनेत्री अनेक मालिका, चित्रपटांमध्ये आल्या. त्यांच्यावर टीका करण्यासारखं काहीचं नव्हतं. मग, वनिताच्या सौंदर्याची व्याख्या कशी करणार? तिने स्वत:च्या शरिरावर प्रेम केलं, आपल्या मनाचं ऐकलं. बॉडी पॉझिटिव्हीटी काय असते, हे दाखवून देण्यासाठी तिने केलेला प्रयास, धाडस नक्कीचं वाखाणण्याजोगी आहे. बिनधास्त, बोल्ड वनिता खरेची प्रतिमा एक कॉमेडियन स्टार असण्याबरोबरचं बोल्डदेखील झाली आहे.        

काय म्हणावं 'या' ट्रोलर्सना? 

टीका करणं हे ट्रोलर्सचं कामचं आहे. काही नेटकऱ्यांनी वनिताला खरंखोटं का ऐकवावं? ट्रोलर्सनी आपली मानसिकता बदलायला हवी.  

बिनधास्त वनिताला सईचा पाठिंबा 

बिनधास्त, बोल्ड आणि झिरो फिगर, सौंदर्याची व्याख्या मोडून काढणाऱ्या वनिताला अभिनेत्री सई ताम्हणकर, उर्मिला कोठारेने समर्थन दर्शवले आहे. उर्मिलाने 'सौंदर्याला वजनाची मर्यादा नाही' (There is No weight limit on Beauty) असे म्हटलं आहे. तर सईनेदेखील वनिताचा तो फोटो शेअर करत 'हे वर्ष पूर्णपणे आपलं आहे, खरोखर आणि निर्भयपणे! हा विचार कीर्तीवंत आहे.' (This year is about owning you, entirely, truly and fearlessly! Kudos for this amazing thought) अशी कमेंट दिली आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT