अनुपमा गुंडे
अलीकडच्या काळात सेकंड इनिंगमध्ये लग्नगाठ बांधणं हा चर्चेचा विषय राहिला नाही, उलट आयुष्यातील एक जोडीदार अकाली गेला असेल तर मागे राहणार्या एकाने मुलाबाळांच्या जबाबदार्या पार पडल्यानंतर आयुष्याच्या सांजवेळी बांधलेल्या लग्नगाठीला समाजमान्यता देण्याइतका समंजस विचार समाजात रूजतो आहे. पण हीच लग्नगाठ सेकंड इनिंगकडे वाटचाल करणार्या एका पुरूषाने आपल्या मुलाच्या वयाच्या मुलीशी लग्न केल्यानंतर निर्माण झालेल्या एका गुंत्यांची गोष्ट आहे. हा गुंता नात्यांची वीण न उसवता नात्याची निरगाठ अधिक घट्ट बांधण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे.
चित्रपटाची कथा लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या एका मराठमोळ्या कुटुंबात घडते. कुटुंबांची घडी विस्कटलेल्या या देशात एकत्र कुटुंब पध्दती, ज्येष्ठांचा मान आणि पत्नी गेल्यानंतर मुलासाठी संसाराचा दुसरा डाव न मांडणार्या जयदेव देशमुख (प्रसाद ओक) आणि त्यांच्या कुटुंबाची कथा आहे.
लंडनमध्ये वडापावचा मोठा व्यावसायिक असलेल्या जयदेवला आपला हा व्यवसाय प्रत्येक देशात सुरू करण्याची इच्छा असते. त्याच्या या व्यवसायात देशमुख कुटुंबीय त्याला मदत करत असते. या व्यवसायाची धुरा सांभाळणारा मुलगा अर्जुनसाठी (अभिनय बेर्डे) वधू संशोधन सुरू असते. वधू संशोधनाच्या या मोहिमेत अर्जुनला योगायोगाने काव्या (रितिका श्रोत्री) भेटते.
दोघे प्रेमात पडतात आणि त्यांच्या लग्नाच्या गोष्टी सुरू होण्याआधीच चक्क वडीलच लग्न करून घरी येतात, तेही आपल्या वयाच्या मुलीसोबत, हे पाहून अर्जुन त्यांच्यापासून दुरावतो. पण चित्रपटाच्या कथेत हा एकच धक्का नाही तर अर्जुनची प्रेयसी ही आपल्या सावत्र आईची सख्खी बहीण असल्याचे कळल्यावर वडील आणि मुलाचे आणि बहिणीबहिणींचे नाते एका अजब वळणावर येते.
गोडीगुलाबी आणि एकोप्याने राहणारे हे कुटुंब या नात्याचा गुंता कसा सोडवतात, हे चित्रपटात पाहणे रंजक आहे. आपल्या आयुष्यात कोण येणार हे विधिलिखित असते, कधी - कधी नियती नात्याची परीक्षा घेते. त्यावेळी कुणी नाती तोडण्याचा मार्ग स्वीकारतात, तर कुणी एकाने त्याग करावा,अशी दुसर्याची अपेक्षा असते. आयुष्याची सेकंड इनिंग जगणारे वडील नंतर आपल्या मुलाच्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडलेला एक समजंस प्रियकर, आपला मुलगा, कुटुंब हे नातं स्वीकारेल का गुंत्यात हरवलेला पोक्त प्रौढ प्रसाद ओक यांनी चांगला साकारला आहे.
गौरी नलावडे हिने प्रेयसी आणि नंतर एक मॅच्युअर्ड पत्नी अशी भूमिका साकारली आहे. अभिनय बेर्डे या चित्रपटातही अर्जुनच्या भूमिकेत आपली छाप सोडली आहे. रसिका वेंगुर्लेकरची आत्या आणि सविता प्रभुणे यांनी दोन पिढ्यांमध्ये मेळ सांधणारी आजीही लक्षात राहणारी आहे.