पुढारी ऑनलाईन डेस्क - तुफान लोकप्रिय ठरलेल्या "वाट माझी बघतोय रिक्षावाला" या गाण्याचा नवा अवतार सादर झालेला आहे. २००९ मध्ये प्रसिद्ध झालेलं हे गाणं – मूळतः रेश्मा सोनावणे यांनी गायलेलं होतं. गाणं ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला २.०’ अल्ट्रा म्युझिक आणि कृणाल म्युझिक यांच्या सहयोगाने, प्रसिद्ध रॅपर संदीप नेगी यांनी या गाण्याला नव्या शैलीत आणलं आहे. दिग्दर्शक सचिन रामचंद्र अंबट यांनी त्याला भव्य दृकश्राव्य रुप दिलं आहे.
मराठी गाण्यात हिंदी रॅपचा नवा धमाका - या नव्या आवृत्तीत गाण्याच्या पारंपरिक ठेक्याला आधुनिक स्पर्श देण्यात आला आहे. मराठी बीट्स आणि समकालीन हिंदी रॅप यांचा उत्तम मिलाफ असलेल्या या गाण्याला तरुणाईत तुफान प्रतिसाद मिळत आहे. व्हिडिओत मीरा जोशी आणि विश्वास पाटील ह्या दोघांनी आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांना ठेका धरायला लावलं आहे.
या रिमिक्सबद्दल म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शक सचिन रामचंद्र अंबट म्हणाले, "या लोकप्रिय गाण्याला नव्या ढंगात सादर करणं हे एक आव्हान होतं, पण आम्ही त्याचा मूळ आत्मा कायम ठेवत त्याला आधुनिक संगीताचा तडका दिला आहे. प्रेक्षकांना हा नॉस्टॅल्जिया आणि नावीन्याचा मिलाफ नक्कीच आवडेल." रॅपर संदीप नेगी म्हणतात, "मराठीत पहिल्यांदाच असं हटके रॅप-रिमिक्स आणतोय. हा बीट ऐकलात की, पाय आपोआप थिरकायला लागतील!"