V shantaram Biopic first look out
भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्ही. शांताराम यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘भारतीय चित्रपटाचा पहिला गेमचेंजर’ म्हणून गौरवण्यात आलेल्या शांतारामांच्या क्रांतिकारी प्रवासाचे दर्शन घडवणारे हे चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीला नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम. त्यांचा जीवनप्रवास ते वैभवशाली चित्रपटाचा काळ नव्या सिनेमातून समोर येणार आहे. स्टुडिओमधील साध्या कामगारापासून ते दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे सर्व काही या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे.
'झनक झनक पायल बाजे', 'दो आंखें बारह हाथ', 'अमृतमंथन', ‘नागरिक’ सारख्या वास्तववादी कथानकापर्यंत भारतीय चित्रपटाला नवी दिशा मिळालीय. आता त्यांचे वैभवशाली जीवन एका मेगा बायोपिकच्या रूपात मोठ्या पडद्यावर येत आहे.
व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत कोण कलाकार?
या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत झळकणार असून ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील एक गेम चेंजर ठरणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित शिरीष देशपांडे यांनी केले आहे.
राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स ॲण्ड रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे निर्माते आहेत. येत्या नवीन वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.