Upcoming Marathi Movie
Instagram
मनोरंजन

एकापेक्षा मराठी चित्रपटांची प्रतीक्षा; अफलातून कहाणींची धमाल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोकणी माणसाचं आणि गणेशोत्सवाचं अजोड नातं आहे. ‘गणपती’ असा शब्दोच्चार जरी झाला तरी एक वेगळीच लहर कोकणी माणसाच्या मनाला स्पर्शून जाते. कोकणी माणसाला गणपतीत गावची ओढ लागण्याचं आणखी एक कारण कोकणवासी खरोखरच गोतावळा प्रिय असतो. नातेसंबंध जपण्यासाठी, पाहुणचारासाठी त्याची विशिष्ट अशी ओळख आहे. या सणाच्या निमित्ताने नात्यांचे बंध जपत उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी याहून अनोखी संधी असूच शकत नाही. याच गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचं आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घेऊन 'घरत गणपती' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट २६ जुलैला आपल्या भेटीला येत आहे.

'घरत गणपती' या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर आधीच प्रदर्शित झाला आहे.

'प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची' गोष्ट… 'घरत गणपती'

निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव,संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग, आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.

चित्रपटाला साजेशी चार गाणी चित्रपटात असून 'माझा कोकण भारी' आणि 'नवसाची गौराई माझी' या गाण्यांना सोशल माध्यमावर उत्तम प्रतिसाद मिळतोय. श्रद्धा दळवी, समीर सामंत,अलोक सुतार यांनी लिहिलेल्या गीतांना जावेद अली, विशाल ददलानी, अभय जोधपूरकर, सायली खरे, ‘द कोकण कलेक्टिव्ह’ गर्ल्स यांनी स्वरबद्ध केलं आहे

"नेता गीता"'मधून उलगडणार कॉलेजचं राजकारण ते प्रेम प्रकरण

कॉलेजच्या काळातलं राजकारण, त्यावेळची नेतागिरी हा रोचक काळ असतो. तारूण्यातली धमक दाखवण्याची ती एक संधी असते. कॉलेज जीवनातलं राजकारण ते प्रेम प्रकरण हा धमाल प्रवास नेता गीता या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं होतं. अभिनेत्री शिवानी बावकर चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार असून अभिनेता सुधांशू महेश बुडुख या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

सिम्बारिया फिल्म्सतर्फे "नेता गीता" या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती करण्यात येत आहे. सुधांशू महेश बुडुख यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. शिवानी बावकरसह सुधांशू बुडुख रोहित कोकाटे, अनिल नगरकर, विठ्ठल काले, अजय तापकिर, विराज अवचिते, सुहास जोशी, सुचेत गवई, विक्रांत धीवरे असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. रोशन मारोडकर यांनी छायांकन, निरंजन पेडगावकर यांनी संगीत, सौमित्र धारासूरकर यांनी संकलन, तर संजीर हवालदार, धीरज भालेराव यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.

इतिहासातलं सुवर्णपान रुपेरी पडद्यावर ‘भूपती’ येतोय

असं म्हणतात की, दिनिशा फिल्म्स प्रा.लि.यांच्या आगामी 'भूपती' या मराठी चित्रपटातून होणार आहे. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन दिनेश जगताप करीत असून निर्मिती यशराज जगताप यांची आहे. छायांकन मंगेश गाडेकर करणार आहेत. ‘हजारॊ वर्षांपासूनच या घनदाट जंगलातलं त्यांचं राज्य देवभूमी... जेव्हा जेव्हा शत्रूंनी चाल केली तेव्हा तेव्हा त्यांना यमसदनी धाडलंय… तोच पुन्हा येतोय..! असा भारदस्त आवाज आणि ऐतिहासिक वास्तूमधील एक दिव्यमूर्ती ‘भूपती’च्या मोशन पोस्टरमध्ये पहायला मिळते आहे. २०२५ मध्ये ‘भूपती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.

व्हॅलेंटाईन डे ला येणार "नखरेवाली"

जिओ स्टुडिओ आणि चित्रपट निर्माते आनंद एल राय यांच्या सहकार्याने त्यांच्या आगामी निर्मिती नखरेवालीच्या पहिले पोस्टर आधीच समोर आले आहे. नवोदित कलाकार अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव मुख्य भूमिकेत दिसणार असून १४ फेब्रुवारी, २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे ! २०२५ च्या व्हॅलेंटाईन डे ला नखरेवाली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जिओ स्टुडिओ आणि कलर यलो प्रॉडक्शन यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही घोषणा केली असून पोस्टमध्ये म्हटले आहे, "✨ प्यार का नया नखरा लेके आ रहे हैं व्हॅलेंटाइन 2025 पर ✨ #JioStudios & #AanandLRai अभिमानाने #Nakrewaalii सादर करत आहेत ज्यात नवोदित @anshduggal आणि @awwwrat आहेत!"

राहुल शांकल्या दिग्दर्शित आणि दिव्य निधी शर्मा लिखित नखरेवालीची निर्मिती ज्योती देशपांडे आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा यांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT