पुढारी ऑनलाईन डेस्क - ''प्रेम कुणाचे नाही कुणावर...प्रेम असे आभासच केवळ, प्रेम असावी एक कल्पना...प्रेम मनातील व्यर्थ भावना, सोडूनी अर्ध्यावर जाते कोणी कुणा...आठवांच्या उरती छळणाऱ्या खुणा, तरी ही चाहूल गोड़ कुणाची जिवाला ओढ लावी, का नाव कुणाचे घेता ही रात दरवळून यावी, ह्या मनात रुजलेला कोणाचा गोडवा...तू ही रे माझा मितवा…''
लेखिका रोहिणी निनावे यांनी लिहिलेलं हे शीर्षकगीत अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमाची गोष्ट सांगून जातं. या दोघांची प्रेम कहाणी थोडी हटके आहे. एकमेकांच्या प्रेमात ते जितके बुडाले आहेत तितकेच ते एकमेकांचा तिरस्कारही करतात. म्हण्टलं तर एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि म्हटलं तर एकमेकांसोबत रहाताही येत नाही. थोडक्यात प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव आणि ईश्वरीची हटके लव्हस्टोरी म्हणजे तू ही रे माझा मितवा ही मालिका. कुन्या राजाची गं तू रानी मालिकेतून घराघरात पोहोचलेली गुंजा म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतील.
या मालिकेची निर्मिती महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता यांच्या टेल अ टेल मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या निर्मिती संस्थेने केली आहे. शैलेश शिर्सेकर या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. नवी मालिका तू ही रे माझा मितवा २३ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.