यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी टीझरचे सिनेमॅटिक सादरीकरण आणि यशच्या लूकचे कौतुक केले, तर काही नेटकऱ्यांनी तो अतिशय बोल्ड असल्याची प्रतिक्रिया देत टीझरवर टीका केली.
अभिनेता यशच्या बहुचर्चित 'टॉक्सिक' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. दमदार व्हिज्युअल्स, स्टायलिश सादरीकरण आणि यशचा वेगळा लूक यामुळे अनेक चाहत्यांनी टीझरचे कौतुक केले. मात्र, दुसरीकडे काही सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी टीझरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेतला. अतिशय बोल्ड, अश्लील" असे संबोधत टीका केली.
टीझर प्रदर्शित होताच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया उमटू लागल्या. काही वापरकर्त्यांनी चित्रपटाच्या मांडणीचे, पार्श्वसंगीताचे आणि यशच्या स्क्रीन प्रेझेन्सचे कौतुक केले. तर काहींनी टीझरमधील काही दृश्ये अनावश्यकपणे उत्तेजक असल्याचे मत व्यक्त केले. काही पोस्टमध्ये दिग्दर्शकाकडून अशा प्रकारच्या सादरीकरणाची अपेक्षा नव्हती, अशीही प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळाली.
यशच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटाचा 'लेडीज अँड लेडीज' हा नवीन टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांसारख्या अभिनेत्रींची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळत असली, तरी त्यांच्या सादरीकरणावरून प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
महिला पात्रांची ओळख प्रभावीपणे करून देण्याऐवजी टीझरमध्ये ग्लॅमर आणि कामुक दृश्यांवर अधिक भर दिल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) आणि रेडिटवरील अनेक पोस्टमध्ये महिला पात्रांचे 'ऑब्जेक्टिफिकेशन' करण्यात आल्याची टीका करण्यात आली. काहींनी दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्यावरही नाराजी व्यक्त करत टीझरला अश्लीलतेकडे झुकणारे असल्याचे म्हटले. काहींनी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाची बारकाईने तपासणी करावी, अशी मागणीही केली.
दुसरीकडे, काही प्रेक्षकांनी स्पष्ट केले की त्यांना प्रौढ आशयाचा आक्षेप नसून तो ज्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे, त्याबद्दल नाराजी आहे. त्यांच्या मते, कामुकता आणि अश्लीलता यांच्यातील सीमारेषा या टीझरमध्ये धूसर झाल्याचे दिसते. टीझरमधील शेवटच्या दृश्यावरही अनेकांनी आक्षेप घेत 'मेल गेझ'ला (Male gaze) प्रोत्साहन दिल्याची टीका केली. रेडिटवरील चर्चेतही महिला पात्रांना संवाद किंवा पुरेसा स्क्रीनटाइम न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
या चित्रपटाची रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलल्यानंतर 'टॉक्सिक' आता २६ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे. व्यंकट के. नारायण आणि यश यांनी 'केव्हीएन प्रॉडक्शन्स' तसेच 'मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स'च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कन्नड आणि इंग्रजी भाषेत चित्रित झालेला हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्येही रिलीज केला जाणार आहे.