मनोरंजन

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या समस्यांसाठी रंगकर्मींना एकत्र येण्याचे आवाहन (Video)

Pudhari News

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाने गेल्या शंभर वर्षात किंवा कदाचित त्याहुनही जास्त वर्षात अनेक अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक अक्षरश: घडवले असं म्हणता येईल. अनेक मान्यवर नटांची, दिग्दर्शकांची नाटकं इथं सादर झाली ज्यामधून अनेक कलाकारांना प्रेरणा मिळाली. पण गेल्या काही वर्षात हेच नाट्यगृह अनेक समस्यांनी वेढलेलं आहे. या ठिकाणी अनेक असुविधा तर आहेतच पण थिएटर भाड्यामध्येसुद्धा बरीच वाढ झालेली आहे. कोल्हापूरच्या स्थानिक कलाकारांना इथं नाटक सादर करणं आर्थिक कुवतीबाहेरचं होऊन बसले आहे. व्यावसायिक नाटकांचे प्रयोगही इथं  सादर होण्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. 

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या निरनिराळ्या समस्यांबाबत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे ही कलाकार म्हणून जबाबदारी आहे. म्हणूनचं कोल्हापूरमधील सर्व हौशी नाट्यसंस्था आणि नाट्य परिषद कोल्हापूर शाखा तसेच सर्व रंगकर्मींच्यावतीने दिनांक १७ डिसेंबर २०२० रोजी केशवराव भोसले नाट्यगृहाजवळ निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी रंगकर्मींकडून कोल्हापूर महानगर पालिकेला नाट्यगृहाच्या समस्यांबाबत निवदेन देण्यात येणार आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व कलाकारांनी जमण्याचे आवाहन कोल्हापूरच्या रंगकर्मींतर्फे करण्यात आले आहे.  

काय म्हटलंय परिपत्रकात….

जसं आपलं निरनिराळया माणसांशी नातं  निर्माण झालेलं असतं तसंच काही वास्तुंशीसुद्धा नातं निर्माण झालेलं असतं.    प्रत्येक रंगकर्मीचं तो सादर करत असलेल्या रंगमंचाबरोबर एक वैशिष्टपुर्ण नातं तयार झालेलं असतं. असे अनेक थोर कलावंत होऊन गेले ज्यांचा देवावर विश्वास नव्हता पण रंगमंचाला मात्र त्यांनी देवाचंच स्थान दिलं. आपल्या कलाप्रवासात ज्या ज्या लोकांनी आपल्याला घडवलं त्यांची नावं आपण आदरानं घेतो पण ज्या नाट्यगृहात आपण नाटक सादर करतो किंवा ज्या नाट्यगृहात आपण शेकडो नाटकं पाहून तयार होतो त्या नाट्यगृहाचं नाव आपण घ्यायला बहुदा आपण विसरतोच. हे सगळं आत्ताच बोलण्याचं कारण म्हणजे कोल्हापुरचं केशवराव भोसले नाट्यगृह. 

खरंतरं ह्या नाट्यगृहानं कोल्हापूरात गेल्या शंभर वर्षात किंवा कदाचित त्याहूनही जास्त वर्षात अनेक अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक अक्षरश: घडवले असं म्हणता येईल. अनेक मान्यवर नटांची, दिग्दर्शकांची नाटकं इथं सादर झाली ज्यामधून अनेक कलाकारांना प्रेरणा मिळाली. अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या चेहर्‍याला पहिला मेकअप ह्याच ठिकाणी लागला. कोल्हापूरचा प्रेक्षक अभिरुची संपन्न बनला तो ह्याच नाट्यगृहात सादर झालेल्या शेकडो नाटकांमुळे. पण गेल्या काही वर्षात हेच नाट्यगृह अनेक समस्यांनी वेढलेलं आहे. ह्या ठिकाणी अनेक असुविधा तर आहेतच पण थिएटर भाड्यामध्येसुद्धा बरीच वाढ झालेली आहे. कोल्हापूरच्या स्थानिक कलाकारांना इथं नाटक सादर करणं आर्थिक कुवतीबाहेरचं होऊन बसले आहे. 

व्यावसायिक नाटकांचे प्रयोगही इथं  सादर होण्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. हे नाट्यगृह फायद्यात नाही असे कारण देत स्थानिक प्रशासनही नाट्यगृहाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असावे असे दिसतंय. मुळात निरनिराळया प्रकारच्या कलाप्रकारांच्या सादरीकरणातून भरपूर पैसे मिळावे हा दृष्टिकोनच अव्यवहार्य आहे. कला माणूस म्हणून आपले जगणे समृद्ध करत असते. आपल्या खिशात आलेला पैसा ते काम करु शकत नाही. ज्या नाट्यगृहानं कोल्हापूरचं नावं कलापूर होण्यात गेली शंभरहून अधिक वर्षे मोलाची कामगिरी बजावली त्या नाट्यगृहाचे मोल कसे ठरवणार?  कोल्हापूरची 'कलापूर' ही ओळख पुसून फक्त पैसे मिळवणारं गावं एवढीच ओळख आपण ठेवायची आहे का? 

पुर्वी इंग्लंडमध्ये कलाकारांना सरकारी भत्ते दिले जात. दुसर्‍या महायुद्धामुळं आलेल्या आर्थिक मंदीमुळे तिथल्या काही अधिकार्‍यांनी कलाकारांचे भत्ते बंद करण्याचा प्रस्ताव तत्कालीन पंतप्रधान वेस्टन चर्चिल ह्यांना पाठवला. तो प्रस्ताव वाचून चर्चिल ह्यांनी त्या अधिकार्‍यांना विचारले, "for whom we are fighting?" चर्चिल ह्यांच्या त्या प्रश्नानंतर तो प्रस्ताव बारगळला.

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या निरनिराळ्या समस्यांबाबत उदासीन भूमिका स्थानिक कलावंतांनीसुद्धा घेवू नये. तिथल्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे ही कलाकार म्हणून आपलीही जबाबदारी आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन कोल्हापूरमधील सर्व हौशी नाट्यसंस्था आणि नाट्य परिषद कोल्हापूर शाखा तसंच कोल्हापूरमधील सर्व रंगकर्मींच्या वतीनं दिनांक १७ डिसेंबर २०२० रोजी केशवराव भोसले नाट्यगृहाजवळ सर्व रंगकर्मींनी जमून कोल्हापूर महानगर पालिकेला नाट्यगृहाच्या समस्यांबाबत निवेदन देण्याचे ठरले आहे. आपणा सर्व रंगकर्मींना कळकळीची विनंती आहे की आपण ह्या उपक्रमासाठी  मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कोल्हापूरच्या सर्व  रंगकर्मींना सहकार्य करावे. ज्या नाट्यगृहानं आजवर शेकडो नाटकं आपल्या दाखवली, अनेक कलाकार घडवले, आपल्यापैकी कित्येकांनी ह्याच रंगमंचावर पहिलं पाऊल टाकलं त्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व कलाकार एकजूट होऊया.

शब्दांकन : विद्यासागर अध्यापक 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT