Tiger Shroff Video Pudhari
मनोरंजन

Tiger Shroff Video: टायगर श्रॉफच्या अंगात घुसले गोळीचे छर्रे! समोर आला थरकाप उडवणारा व्हिडिओ; टीम म्हणाली…

Tiger Shroff Firing Incident: मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत त्याच्या हाताला गोळीचे छर्रे लागल्याची माहिती आहे.

Rahul Shelke

Tiger Shroff Firing Incident: अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात टायगर थोडक्यात बचावला असला, तरी त्याच्या हाताला गोळीचे छर्रे लागल्याची माहिती समोर आली आहे. टायगरच्या टीमने त्याच्या हाताला झालेल्या जखमांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत टीमने ‘देवाची कृपा आहे’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

टायगरच्या हातावर झालेल्या जखमा या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. विशेष म्हणजे, या कठीण प्रसंगानंतरही टायगर व्हिडीओमध्ये त्याचे बायसेप्स दाखवताना दिसत आहे. या घटनेनंतर त्याच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

बिश्नोई गँगने घेतली हल्ल्याची जबाबदारी?

रविवारी रात्री टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात घडली. गोळीबार झाला, तेव्हा टायगर गाडीत बसला होता. या घटनेत टायगरचा चालक आणि त्याचा चाहता उमेश चौहान हे दोघे जखमी झाले.

या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तीने घेतली आहे. अनिल पंडित याने सोशल मीडियावर पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी घेत असल्याचे म्हटले. टायगरला याआधी फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला होता, असा दावाही अनिल पंडितने केला.

तसेच, चित्रपटसृष्टीतील जे कलाकार त्यांचे म्हणणे ऐकणार नाहीत आणि सलमान खानसोबत काम करतील, त्यांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, अशी धमकी या पोस्टमधून देण्यात आली आहे.

हल्ल्याप्रकरणी १० जणांना अटक

टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईचे डीसीपी रजतिलक रोशन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, १८ ऑक्टोबर रोजी जुहू येथे टायगरच्या गाडीवर गोळीबार झाला. त्यानंतर अवघ्या १५ तासांत आरोपींचा शोध घेण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण आणि या प्रकरणातील इतर बाबी तपासातून स्पष्ट होतील.

उमेश चौहानवर शस्त्रक्रिया

या गोळीबारात जखमी झालेल्या उमेश चौहान यांच्यावर केईएम रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या शरीरात घुसलेली गोळी शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली आहे. त्यानंतर पुढील देखरेखीसाठी त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले.

हल्ल्यानंतर टायगर श्रॉफ पुन्हा कामावर

या गोळीबाराच्या घटनेत जखमी झाल्यानंतरही टायगर श्रॉफ पुन्हा कामावर परतल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या टीमने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे त्याच्या जखमांची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे टायगरच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून, तो लवकर पूर्णपणे बरा व्हावा, अशी भावना अनेकजण व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT