पुढारी ऑनलाईन डेस्क - ‘२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ १० जानेवारी ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात निवडलेले ६१ चित्रपट मुव्हीमॅक्स अंधेरी, सायन आणि ठाणे येथे दाखवले जातील. कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. (Third Eye Asian Film Festival)
थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या २१ व्या आवृत्तीत आशियाई स्पेक्ट्रम विभागात चीन, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, कझाकिस्तान, ट्युनिशिया, जपान, इराण, साउथ कोरिया आणि श्रीलंका या देशातील चित्रपटांचा समावेश आहे आणि साउथ कोरिया मधील सहा चित्रपट कंट्री फोकस विभागात दाखवले जातील. आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमधील अकरा चित्रपटांचा समावेश आहे. त्यात नवीनचंद्र दिग्दर्शित ‘झंझारपुर’, प्रबल खुंद दिग्दर्शित ‘पाई तंग’, जदुमनी दत्ता दिग्दर्शित ‘जुईफुल’ या चित्रपटांचा समावेश आहे. (Third Eye Asian Film Festival)
मराठी स्पर्धा विभागात आठ मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. आशा (दिग्दर्शक दीपक पाटील), सिनेमॅन (दिग्दर्शक उमेश बगाडे), कर्मयोगी आबासाहेब (दिग्दर्शक अल्ताफ शेख ), जिप्सी (दिग्दर्शक शशी खंदारे), भेरा (दिग्दर्शक श्रीकांत भिडे), मॅजिक (दिग्दर्शक रवी करमरकर), मंडळ आभारी आहे (दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक), छबिला (दिग्दर्शक अनिल भालेराव) यांचा या स्पर्धा विभागात समावेश करण्यात आला आहे.
या महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देण्यात येणार आहे. पत्रकार रफिक बगदादी यांना ‘सत्यजित राय मेमोरियल पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.
दिवंगत सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक अनिल झणकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. दिवंगत दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तसेच राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांची भूमिका असलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.