पुढारी ऑनलाईन डेस्क: Ranya Rao Bail | सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटकेत असलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिचा जामीन अर्ज गुरुवारी (दि.२७ ) सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर तिला न्यायालयीन कोठडीतच ठेवण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. रान्या राव हिचा जामीन अर्ज फेटाळण्याची ही तिसरी वेळ आहे. अभिनेत्री आता कर्नाटक उच्च न्यायालयात जाणार का?, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
अभिनेत्री रान्या रावला (ranya rao) ३ मार्चच्या रात्री केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केआयए) महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर ४ मार्चला तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनानली होती. दरम्यान बंगळूरमधील न्यायालयाने तिचा जामीन अर्ज आज (दि.२७) फेटाळला. त्यामुळे तिला कोणताही दिलासा मिळालेला नाही.
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला सोने तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली. तिने माणिक्य आणि पत्की सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती पोलिस महासंचालक (पोलिस गृहनिर्माण महामंडळ) रामचंद्र राव यांची मुलगी आहे. तिच्यावर १४.८ किलो सोने ठेवल्याचा आरोप होता, या प्रकरणात तिला केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली होती.
न्यायालयाने रान्या राव हिचा जामीन नाकारण्याची अनेक कारणे सांगितली आहेत. यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की,"रान्याच्या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत, ज्यामुळे सीमापार परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. तिच्यावर तिच्या वारंवार परदेश दौऱ्यांदरम्यान कस्टम सामान नियमांचे उल्लंघन केल्याचा देखील आरोप आहे. नोंदी दर्शवितात की, तिने फक्त एका वर्षात २७ वेळा परदेश प्रवास केला होता.
अधिकाऱ्यांनी असा देखील युक्तिवाद केला की, "जर तिला जामीन मिळाला तर ती पुराव्यांशी छेडछाड करू शकते किंवा तपासाची दिशाभूल करू शकते. न्यायालयाने २८ टक्के कस्टम ड्युटी चुकवण्यात सहभागी असल्याच्या आरोपांचीही दखल घेतली, ज्यामुळे सरकारी तिजोरीचे एकूण ४कोटी, ८३ लाख, ७२ हजार ६९४ रुपयांचे नुकसान झाले आहे.
यानंतर न्यायालयाने सुनावणीवेळी युक्तिवाद केला की, "जर तिला सोडण्यात आले तर ती देश सोडून पळून जाऊ शकते. अशीही चिंता होती की ती साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकते किंवा तपासात अडथळा आणू शकते". म्हणून तिचा जामीन अर्ज सलग तिसऱ्यांदा न्यायालयाने फेटाळला आहे.