The world's smallest doctor! ३ फूट उंची, सर्कसची ऑफर नाकारून केलं MBBS; अमिताभ बच्चनही झाले थक्क file photo
मनोरंजन

The world's smallest doctor! ३ फूट उंची, सर्कसची ऑफर नाकारून केलं MBBS; अमिताभ बच्चनही झाले थक्क

डॉक्टर गणेश बरैया यांचा थक्क् करणारा प्रेरणादायी प्रवास..

पुढारी वृत्तसेवा

The world's smallest doctor! ३ फूट उंची, सर्कसची ऑफर नाकारून केलं MBBS; अमिताभ बच्चनही झाले थक्क

पुढारी ऑनलाईन : जगातील सर्वात छोटे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे गणेश बरैया अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोड़पती 18’ या लोकप्रिय शोमध्ये पोहोचले. शोमध्ये त्यांनी आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली. कमी उंचीमुळे त्यांना MBBS मध्ये प्रवेश मिळत नव्हता. मात्र त्यांनी हार मानली नाही आणि आज ते डॉक्टर बनले आहेत.

आयुष्यात पुढे जाण्याची जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असेल, तर कोणतीही अडचण माणसाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. डॉक्टर गणेश बरैया याचे जिवंत उदाहरण आहेत. गणेश बरैया यांची उंची अवघी 3 फूट 4 इंच आहे. मात्र त्यांचा आत्मविश्वास आणि जिद्द खूप मोठी आहे. याच मेहनतीच्या जोरावर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोड़पती’च्या मंचावर स्थान मिळवलं.

अमिताभ बच्चन यांनीही खास अंदाजात ‘कौन बनेगा करोड़पती 18’च्या हॉट सीटवर डॉक्टर गणेश बरैया यांचे स्वागत केले. गुजरातमधील गोरखी गावचे रहिवासी असलेले गणेश KBCच्या अलीकडील भागात दिसले. त्यांनी केवळ आपल्या खेळाने प्रेक्षकांना प्रभावित केले नाही, तर आपल्या प्रेरणादायी प्रवासातून प्रत्येकाची मने जिंकली.

मात्र 3 लाख रुपयांच्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्यामुळे गणेश यांचा KBCमधील प्रवास संपला आणि ते केवळ 25 हजार रुपये घेऊन घरी परतले. मात्र त्यांची संघर्षकथा आणि जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली.

सर्कसमध्ये काम करण्याची मिळाली होती ऑफर

KBC 18 मध्ये गणेश यांनी आपल्या बालपणीची भावूक करणारी घटना सांगितली. त्यांनी खुलासा केला की, ते प्राथमिक शाळेत शिकत असताना सर्कसशी संबंधित काही लोक त्यांच्या घरी आले होते. त्यांनी गणेश यांना सोबत नेण्यासाठी त्यांच्या वडिलांना 5 लाख रुपयांची ऑफर दिली होती.

मात्र गणेश यांच्या वडिलांनी सर्कसवाल्यांची 5 लाख रुपयांची ऑफर नाकारली. मुलाला सर्कसमध्ये पाठवण्याऐवजी त्यांनी त्याला शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.

MBBSसाठी कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नव्हता

KBCमधील एका व्हिडिओमध्ये गणेश म्हणाले, “बालपणी सर्कसवाल्यांनी माझ्यासाठी 5 लाख रुपयांची बोली लावली होती. पण मी कधीही हार मानली नाही. मेहनतीच्या जोरावर मी NEET परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र कमी उंचीमुळे कोणत्याही कॉलेजने मला प्रवेश दिला नाही. तेव्हा मला जाणवलं की केवळ ज्ञान पुरेसं नाही, तर काहीतरी वेगळा विचारही करावा लागेल.”

ते पुढे म्हणाले, “मी कधी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, तर कधी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला. माझ्या जिद्दीच्या आणि काहीतरी करून दाखवण्याच्या इच्छेच्या जोरावर अखेर मी डॉक्टर बनलो. माझी उंची जरी कमी असली, तरी माझे इरादे छोटे नाहीत.”

आई-वडिलांनी दिला पूर्ण पाठिंबा

अमिताभ बच्चन यांनी शोमध्ये गणेश यांना विचारले की, ते शिक्षणासाठी शाळेत कसे जात होते? यावर गणेश यांनी सांगितले की, कमी उंचीमुळे त्यांना प्राथमिक शाळेत जाण्यात अनेक अडचणी येत होत्या.

त्यांची शाळा घरापासून तब्बल 5 किलोमीटर अंतरावर होती आणि कोणतीही वाहतूक सुविधा उपलब्ध नव्हती. चालत जाताना ते थकून जायचे. त्यामुळे त्यांचे आई-वडील त्यांना आपल्या खांद्यावर बसवून शाळेत घेऊन जायचे. आपल्या संघर्षाची ही आठवण सांगताना गणेश भावूक झाले. अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या जिद्दीचे आणि धैर्याचे कौतुक केले.

गणेश बरैया हे गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील गोरखी गावचे रहिवासी आहेत. त्यांची उंची 3 फूट 4 इंच आहे. The Better Indiaच्या माहितीनुसार, गणेश यांना लहानपणापासूनच बुटकेपणाचा (Dwarfism) त्रास होता, त्यामुळे त्यांची उंची वाढू शकली नाही.

मात्र या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी NEET परीक्षेत चांगली रँक मिळवली. दिव्यांगत्वामुळे सुरुवातीला त्यांना MBBSमध्ये प्रवेश मिळत नव्हता. मात्र त्यांनी आपल्या हक्कासाठी कायदेशीर लढा दिला आणि अखेर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT