राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'येक नंबर' लवकरच भेटीला  Instagram
मनोरंजन

Marathi Movie |तेजस्विनी पंडितचा 'येक नंबर' या दिवशी होणार प्रदर्शित

राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'येक नंबर' या दिवशी होणार प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - चतुरस्त्र अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या सह्याद्री फिल्म्स आणि बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणारे नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने हातमिळवणी केल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून होत होती. या दोघांच्या एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीत धमाका उडणार, याची कल्पना आधीपासून प्रेक्षकांना आली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित 'येक नंबर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यादिवशी येणार 'येक नंबर' चित्रपट

तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. नावावरूनच 'येक नंबर' असणारा हा चित्रपट १० ॲाक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी आणि बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर यांनी केले असून मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या संगीताची भुरळ घालणारे अजय -अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. तर संजय मेमाणे 'येक नंबर'चे छायाचित्रकार आहेत. चित्रपटाबाबतच्या इतर गोष्टी समोर आल्या असल्या तरी यात कोणते कलाकार झळकणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

'येक नंबर' च्या पोस्टरमध्ये दडलंय काय?

नुकत्याच झळकलेल्या पोस्टरमध्ये शहराच्या दिशेने तोंड करून उभा असलेला एक तरुण दिसत असून त्याच्या जॅकेटवर 'मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा' असे लिहिले आहे. खिशात एका मुलीचा फोटो आणि हातात बाटलीही आहे. त्याच्या मनातील धगधगणारी आग यातून व्यक्त होतेय. प्रेमात दंग आणि महाराष्ट्राच्या मातीत पाय रोवून उभा असणारा तरुण नक्की कोण असेल? काय असेल त्याची गोष्ट? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले असतील. तर या प्रश्नाची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळतील.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणतात, " ‘व्हेंटिलेटर’नंतर ‘येक नंबर’ हा माझा दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी माझ्या पहिल्या चित्रपटावर भरभरून प्रेम केले, तसेच किंबहुना दुप्पट प्रेम ‘येक नंबर’वर करतील अशी मला आशा आहे. पोस्टर पाहून सगळ्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया खूपच आनंद देणाऱ्या आहेत. आमच्या टीमची इतक्या दिवसांची मेहनत प्रेक्षकांना आता चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे, याची मला फार उत्सुकता आहे.’’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT